सायबर हल्ल्यातून १.९५ कोटींची फसवणूक; बेळगावीतील दोन आरोपी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

ईमेलद्वारे बँक तपशील बदलून कोट्यवधींची आर्थिक फसवणूक
मनी ट्रेलच्या आधारे पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यातील एका बांधकाम कंपनीची १.९५ कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. ईमेल हॅक करून बँक खात्याचा तपशील बदलत ही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात कर्नाटकातील बेळगावी येथील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी मनी ट्रेलच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींच्या माध्यमातून आणखी आरोपी आणि हँडलरचा शोध सुरू आहे.


पुणे : कर्नाटकातील बेळगावी येथील एका हार्डवेअर दुकानाचा मालक आणि त्याच्या मित्राला सायबर हल्ल्यातील ऑनलाइन फसवणूक प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी जानेवारी महिन्यात हडपसर येथील एका बांधकाम कंपनीची १.९५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सायबर पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय रामविलास यादव (२२) आणि सलमान गौस मोईनुद्दीन अजनाल (३२), दोघेही बेळगावीचे रहिवासी, यांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. १९ जानेवारी रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर मनी ट्रेल तपासण्यात आला असता, फसवणुकीची रक्कम यादवच्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले.

वडिलांसोबत हार्डवेअरचे दुकान चालवणाऱ्या यादवचे संयुक्त बँक खाते असल्याचे तपासात समोर आले. यादवने स्थानिक गॅरेजमध्ये काम करणाऱ्या अजनालसोबत आपल्या बँक खात्याची ओळखपत्रे शेअर केली होती. व्यवहारातून कमिशन देण्याचे आश्वासन देत अजनालने ही माहिती वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. या आधारे अजनाललाही अटक करण्यात आली.

दरम्यान, संबंधित बांधकाम कंपनीने प्रहार डिजिटल कडे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बांधकाम व इतर उपकरणे खरेदीसाठी दुसऱ्या एका फर्मकडे ऑर्डर दिली होती. मात्र, मूळ फर्मच्या पत्त्याशी मिळताजुळता ईमेल आल्याने कंपनीची दिशाभूल झाली. फसवणूक करणाऱ्यांनी ईमेलमध्ये बँक खात्याचा तपशील बदलून रक्कम वेगळ्या खात्यात वळवली.

खात्याच्या तपशीलाची खातरजमा न करता हडपसर येथील कंपनीने १.९५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याने हा प्रकार उघडकीस आला. सध्या अजनालचा हँडलर तसेच इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पुणे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.