भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा गौप्यस्फोट
कुडाळ मालवणचे पुढील आमदार निलेश राणेच होणार हे आ. वैभव नाईक यांनीही ओळखले…
मालवण | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक हे लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिवसेना सोडणार आहेत. असा गौप्यस्फोट भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकालाची आकडेवारी पाहता कुडाळ मालवण मतदार संघात 30 टक्केच शिवसेना (ठाकरे गट) राहिली आहे. त्यामुळे वैभव नाईक आता आमदारकीचे स्वप्न पाहू शकत नाहीत. याचा विचार करता कार्यकर्त्यांची दिशाभूल न करता आ. नाईक यांनी लवकरच निर्णय घेतील. त्यांनी ठाकरे गट सोडला तर त्यांचे स्वागतच करु. मात्र मालवण कुडाळ मतदारसंघाचे पुढील आमदार निलेश राणेंच असतील. असा ठाम विश्वास धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, संतोष गावकर, मालवण तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.
चिंदरकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. ७० टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. कुडाळ मालवण मतदार संघात वैभव नाईक यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ठाकरे गट कार्यकर्ते पुढील वैभव नाईक हेच आमदार आणि विनायक राऊत हेच खासदार असतील असे सांगत असले तरी वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार नाहीत असेच चित्र आहे. वैभव नाईक हे लवकरच ठाकरे गटाला रामराम करतील.
सोबतच कुडाळ मालवण मतदार संघ ग्रामपंचायती मध्ये शिंदे गटाची आकडेवारीही वाढेल. असेही चिंदरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाजवळ दोन्ही तालुक्यात फक्त दहा ते बारा ग्रामपंचायती राहतील. वैभव नाईक पुन्हा आमदार होऊच शकत नाहीत. कार्यकर्त्यांनीही वरिष्ठांशी चर्चा करावी. त्याना सत्य समजेल असेही चिंदरकर म्हणाले.
कुडाळ मालवण मतदार संघात पुढील आमदार निलेश राणेच होतील. जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत निलेश राणे यांच्याच नेतृत्वाला कौल दिला आहे. मालवण कुडाळ मतदारसंघात आगामी सर्व निवडणुकीत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नंबर वन राहील. असाही ठाम विश्वास चिंदरकर यांनी व्यक्त केला.