“टीडीएसचा धक्का आणि करमुक्त उत्पन्नाची गुरुकिल्ली”

सीए जयंती कुळकर्णी कुडाळ

अवनीश – आयटी कंपनीत नोकरी करणारा पगारदार युवक
स्नेहा– अवनीशची पत्नी
जोशी सर – सीए व कर सल्लागार
आई – अनुभवातून शिकवण देणारी

दृश्य १ : पगार आला… पण आनंद गमावला!
महिन्याचा पहिला दिवस. मोबाईलवर मेसेज आला.

**“पगार खात्यात जमा– ₹72,450”**

अवनीश आनंदाने मोबाईल स्नेहाला दाखवतो.
पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह…
“अरे! माझा CTC तर ₹10 लाख आहे… मग हातात एवढेच का आले?”
स्नेहा हसत म्हणाली, “तुला ना, एक दिवस तरी टॅक्स समजून घ्यायलाच हवा!”
तेवढ्यात आईने एक वाक्य टाकलं –
**“बाळा, पैसे कमावणं सोपं… पण वाचवणं शहाणपणाचं!”**
आणि तिथून सुरू झाली करमुक्त उत्पन्न शोधण्याची कथा…

दृश्य २ : CA कडे भेट

अवनीश आणि स्नेहा जोशी सरांच्या ऑफिसमध्ये.

अवनीश (थोडा घाबरून):
“सर, माझा इतका TDS का कापला जातो? काही उपाय नाही का?”
जोशी सर हसले…
“उपाय नाही असं नाही… उलट कायद्यात इतक्या सवलती आहेत की योग्य नियोजन केलं तर टॅक्स खूप कमी होऊ शकतो.”
स्नेहा:
“म्हणजे टॅक्स न देता चालेल?”
सर:
“नाही! टॅक्स चुकवायचा नाही… **टॅक्स वाचवायचा!**”

दृश्य ३ : करप्रणालीचे दोन रस्ते

सरांनी बोर्डवर दोन रस्ते काढले.

| रस्ता          | अर्थ                           |
| ————– | —————————— |
| जुनी करप्रणाली | गुंतवणूक करा आणि टॅक्स कमी करा |
| नवीन करप्रणाली | कमी कर दर, कमी deductions      |

सर म्हणाले,
“२०२५ पासून नवीन पद्धत default आहे. पण तुम्हाला हवं तर जुनी निवडू शकता.”
अवनीश:
“मग कोणती निवडायची?”
सर:
“ते तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे.”

दृश्य ४ : पगारातील लपलेले करमुक्त खजिने

सरांनी अवनीशची salary slip उघडली.
“तुमच्या पगारातच करमुक्त उत्पन्न लपलेलं असतं.”
HRA – घरभाडे भत्ता
सर:
“तुम्ही भाड्याच्या घरात राहता ना? मग HRA वर सूट मिळेल.”

अवनीश:
“म्हणजे भाडं भरतोय म्हणून टॅक्स कमी होईल?”
सर:
“हो! योग्य कागदपत्रे असली की नक्कीच.”
अवनीशच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा स्मित आलं.

Standard Deduction – सर्वांसाठी भेट
सर:
“सरकार म्हणते – ऑफिसला जाता, खर्च होतो… म्हणून थेट deduction.”
अवनीश:
“म्हणजे काहीही न करता टॅक्स कमी?”
सर:
“हो, ही तर सर्व पगारदारांसाठी भेट आहे!”

LTA – सुट्टीत फिरा, टॅक्स वाचवा
स्नेहा उत्साहात:
“म्हणजे ट्रिपलाही फायदा?”
सर:
“भारतामध्ये फिरलात तरच हो!”
स्नेहा: “आता पुढची ट्रिप गोवा!”

दृश्य ५ : 80C – करबचतीचा राजा
सरांनी मोठ्या अक्षरात लिहिलं – **80C = ₹1.5 लाख deduction**
अवनीश:
“एवढे deduction कसे मिळेल?”
सर:
“गुंतवणूक करा!”

80C गुंतवणूक पर्याय

| गुंतवणूक   | फायदा               |
| ———- | ——————- |
| EPF        | सुरक्षित बचत        |
| PPF        | करमुक्त परतावा      |
| ELSS       | वाढ + tax saving    |
| LIC        | संरक्षण + deduction |
| मुलांची फी | थेट deduction       |

अवनीश:
“म्हणजे गुंतवणूक = टॅक्स बचत + भविष्य सुरक्षित!”

दृश्य ६ : आरोग्य विमा – दुहेरी फायदा

सर:
“आरोग्य विमा आहे का?”
अवनीश: “नाही…”
सर गंभीर झाले.
“आजारी पडलात तर बचत संपते. विमा घेतलात तर टॅक्सही वाचतो.”

| विमा           | सूट     |
| ————– | ——- |
| स्वतः + कुटुंब | ₹25,000 |
| पालक           | ₹50,000 |

स्नेहा: “आजच पॉलिसी घेऊया!”

दृश्य ७ : NPS – अतिरिक्त करबचत
सर:
“80C व्यतिरिक्त ₹50,000 deduction अजून मिळू शकतो.”
अवनीश: “कुठे?”
सर: “NPS!”
अवनीश:
“म्हणजे retirement planning = tax saving?”
सर:
“बरोबर!”

दृश्य ८ : गृहकर्ज – EMI पण फायदा

अवनीश:
“घर घेण्याचा विचार आहे…”
सर हसले:
“सरकार म्हणते – घर घ्या, टॅक्स कमी करा.”

| घटक       | सूट       |
| ——— | ——— |
| व्याज     | ₹2 लाख    |
| मूळ रक्कम | 80C मध्ये |

अवनीश: “EMI आता एवढी वाईट वाटत नाही!”

दृश्य ९ : Rebate – शून्य कराची जादू

सर:
“योग्य नियोजन केलं तर तुमचा कर **शून्य** होऊ शकतो.”
अवनीश आणि स्नेहा एकदम:
“खरंच??”
सर:
“हो! ठराविक उत्पन्न मर्यादेत rebateमिळतो.”

अवनीश:
“म्हणजे TDS परत मिळू शकतो?”
सर:
“हो! ITR भरताना.”

दृश्य १० : अवनीशचा बदल

एक वर्षानंतर…

पुन्हा मेसेज आला –
**पगार खात्यात जमा– ₹82,900**

अवनीश आनंदाने म्हणाला:
“या वर्षी TDS खूप कमी झाला!”

स्नेहा:
“आता आपण सुट्टीला जाऊ शकतो!”

आई हसत म्हणाली:
“शहाणपण म्हणजे पैसे वाचवणं.”

निष्कर्ष
पगारदार व्यक्तींसाठी कर हा शत्रू नाही.
तो एक **परीक्षा** आहे –
तुम्ही नियोजन करता की नाही याची.

जर तुम्ही:
* पगार स्ट्रक्चर समजलात
* योग्य गुंतवणूक केली
* विमा घेतला
* घर खरेदीचा विचार केला
तर…
**टॅक्स कमी होतो, बचत वाढते, भविष्य सुरक्षित होते.**

या कथेची शिकवण
“कर वाचवायचा असेल तर
वर्षाच्या शेवटी नाही…
**वर्षाच्या सुरुवातीला विचार करा!**”

प्रत्यक्ष कर नियोजन करताना आपल्या सीएंचा/ करसल्लागारांचा सल्ला घेण्यात यावा.