चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता बामणोली या देवस्थानचा शिमगा उत्सव २ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पालखी वाडीवर भोवनीसाठी फिरणार आहे.

दरवर्षीप्रमाणेच श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिरात सर्व ग्रामस्थ २ मार्चला पालखी सजवण्यासाठी जमतील. सोमवार दिनांक २ रोजी दुपारी तीन वाजता सचिन ओक यांचे येथून देवीची पेटी देवळात नेण्यासाठी गावकरी एकत्र येतील. त्यानंतर पालखी मंदिरात सजवली जाईल. नंतर देवळातून मानाप्रमाणे पालखी उचलली जाईल. वाजत गाजत पालखी सहाणेवर येईल. त्याआधी माडवल नाचविण्याचा कार्यक्रम होईल. रात्री पालखी सहाणेवर राहिल.
शिमगोत्सवात मंगळवार दिनांक ३ रोजी सकाळी ६ वाजता देवीचा होम पेटविण्याचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता सहान भरण्याचा कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी ५ वाजता सहाणेवर खेळ्यांची थाप आणि रात्री सचिन ओक यांचे येथे पालखी वस्तीला राहील.
बुधवार दिनांक ४ रोजी प्रथम मानकरी यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन होईल. संध्याकाळी मानकरी गावकर कै. रत्नू कुळे यांच्या घरी पालखीचे आगमन होईल. रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे होईल.
गुरुवार दिनांक ५ व ६ रोजी पालखी डिंगणकरवाडी येथे भोवनीसाठी जाईल. त्यानंतर शनिवार दिनांक ७ रोजी पालखी पूर्व वणेवाडी येथे जाईल. रविवार दिनांक ८ व ९ रोजी ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन पश्चिमवनेवाडी येथे होईल. तरुण उत्कर्ष मंडळ प. वणेवाडी आणि आदर्श मित्र मंडळ प .वणेवाडी या ठिकाणी पालखी भोवनीला फिरेल.
मंगळवार दिनांक १० रोजी गवळवाडी ग्रामदेवतेचे प्रस्थान होईल. मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.
त्यानंतर बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी ९ वाजता भोवणी हिशोब सचिन ओक यांचे निवासस्थानी होईल.
त्यानंतर गुरुवार दिनांक १२ रोजी दुपारी तीन वाजता सहाणे वर गोंधळ कार्यक्रम होईल नंतर शिंपणे होईल. त्यानंतर पालखी पुन्हा वाजत गाजत मंदिरात जाईल.
अशा भरगच्च शिमगोत्सवाचा कार्यक्रम श्री चंडकाई वाघजाई देवीचा आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाला सर्व भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












