पक्षाशी दगाफटका केला किंवा बंडखोरांशी मैत्री जपली तर गय करणार नाही – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने दैदिप्यमान यश मिळवले असले तरी, विजयाच्या उन्मादात राहू नका. ज्यांनी पक्षाशी दगाफटका केला किंवा बंडखोरांशी मैत्री जपली, मात्र अशांची यापुढे गय केली जाणार नाही, असा कडक इशारा शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. शहरातील जयेश मंगल पार्क येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी विलास चाळके तर मुख्य पक्षप्रतोदपदी महेश उर्फ बाबू म्हाप यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मार्गदर्शन करताना ना. सामंत म्हणाले की, “रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले असून जिल्ह्याचा ‘स्ट्राईक रेट’ ९४ टक्के आहे. राज्यात हे सर्वाधिक यश आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी पडद्यामागून बंडखोरांना साथ दिली, अन्यथा हा आकडा १०० टक्क्यांपर्यंत गेला असता. याचा सर्वाधिक फटका संगमेश्वर तालुक्यात बसला आहे.” भविष्यात संघटना म्हणून कठोर निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासकीय आणि राजकीय सुसूत्रता आणण्यासाठी यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती तसेच पंचायत समिती सभापती-उपसभापती ही पदे आता केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असतील. त्याचप्रमाणे गटनेते आणि मुख्य पक्षप्रतोद ही पदेही सव्वा वर्षासाठीच राहतील. यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना कामाची संधी मिळेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
मी स्वतः, भैय्या आणि योगेशदादा यांनी प्रचंड कष्ट घेऊन मतदारसंघात निधी आणला. मात्र, निवडणुकीच्या काळात काही पदाधिकारी ‘हा निधी आम्हीच आणला’ असे सांगत फिरत होते, हे ग्रामस्थांच्या भेटीत समोर आले आहे. आपण जे निवडून आलो आहोत, ते शिवसेनेमुळे आहोत हे विसरू नका, अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींचे कान टोचले. यापुढे लोकप्रतिनिधींनी आपल्या शेजारील खुर्चीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बसवावे, विरोधकांना नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
तालुकानिहाय पंचायत समिती गटनेते व पक्षप्रतोद: बैठकीत जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांसाठी खालीलप्रमाणे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या:
-
रत्नागिरी: सौ. अर्चना साळवी व तारक मयेकर
-
संगमेश्वर: सुहास मायंगडे व सुरेश माईण
-
चिपळूण: विनोद झगडे व बापू आयरे
-
गुहागर: गौरव वेल्हाळ व प्रणव पोळेकर
-
राजापूर: उमेश पराडकर व प्रसाद मोहरकर
-
लांजा: उमेश पत्की
-
खेड: सुनील मोरे
-
दापोली: निलेश शेठ
-
मंडणगड: अनिल रहाटे व दिपक मालुसरे













