साटेलीत डंपर – दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

बांदा : प्रतिनिधी
सातार्डा – मळेवाड मार्गांवर साटेली तर्फ सातार्डा येथे डंपरने ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने मळेवाड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. जखमी दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

सविस्तर वृत्त असे की, साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अज्ञात डंपर चालकाने दुचाकीस्वाराला (एमएच ०७ एडब्ल्यू ०४४८) ला जोरदार धडक दिली. यात दुचाकिस्वार रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तात्काळ मळेवाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याकामी उमेश कांबळी, संभाजी नाईक, बाबा कोरगावकर, विष्णू मांजरेकर, बाळा साटेलकर यांनी सहकार्य केले.

दरम्यान, अज्ञात डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान ग्रामपंचायत साटेली समोर घडली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरु आहे.