सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ठिकाणी उपक्रम संपन्न…
वेंगुर्ले : दाजी नाईक
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ठिकाणी हा उपक्रम संपन्न झाला, हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. मानवाला निसर्गाबद्दल अधिक संवेदनशील बनवत जलसंरक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संतुलनाचा सामूहिक संकल्प दृढ करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे
आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी अमृतमय विचार व्यक्त करताना सांगितले की, निरंकारी बाबाजींच्या शिकवणी या केवळ स्मरण करायच्या नसून त्या जीवनात अंगीकारण्यासाठी आहेत. खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अर्पण केली जाते. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित होते. सेवा, सुमिरण आणि सत्संग हेच जीवनाचे अधिष्ठान असल्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच सुसंगत आहे. भक्ती ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती आचरणात दिसली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सचिवांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात सेवादलाच्या प्रार्थनेने झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले. देशभर प्रसारित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून सुरक्षा, शिस्त आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आयोजनाची सुसूत्र आणि संस्कारित कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली. याच वेळी खुल्या प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, श्रद्धाळूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ठिकाणी हा उपक्रम संपन्न झाला, प्रत्येक ठिकाणी शेकडो निरंकारी भक्त उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक, सरपंच व उपसरपंच महोदय यांनी उपक्रमा दरम्यान भेटी दिल्या. यामध्ये तुळस मधील गिऱ्याचे गाळव, ता. वेंगुर्ले येथील तळी, पावशी येथील मिटक्याचीवाडी तलावाचा घाट, ता. कुडाळ, कणकवली येथील गड नदी गणपती साना ता. कणकवली, वैभववाडी येथील शांती नदी, ता. वैभववाडी, गिर्ये कॅन्टीन आणि विजयदुर्ग चौपाटी ता. देवगड आदी ठिकाणी जलस्रोत स्वच्छ करून यामध्ये प्लास्टिक, काच ओला व सुका कचरा अशी वर्गवारी करून स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचातच्या सहकार्याने साठलेल्या कचऱ्याची व्हिल्हेवाट लावण्यात आली.












