दोडामार्ग | प्रतिनिधी :बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना करण्याचा प्रयत्न आणि स्मारकाचे रक्षण करणाऱ्या महिलांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद दोडामार्ग तालुक्यात उमटले आहेत. शुक्रवारी दोडामार्ग येथील संतप्त शिवप्रेमींनी एकत्र येत या घटनेचा जाहीर निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
चिखली येथे काही समाजकंटकांनी दारूच्या नशेत हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उखडण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे कृत्य रोखण्यासाठी पुढे आलेल्या शिवप्रेमी भगिनींना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाला इशारा आणि मागणी
तहसीलदारांना निवेदन देताना शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “ज्या स्वराज्यात स्त्रीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान होते, तिथेच असा अत्याचार होणे ही महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी घटना आहे. अशा विकृत प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर सामाजिक स्वास्थ्य बिघडेल,” अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निवेदनातं दोषींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा.
आदी मागण्या करण्यात आल्या आहेत
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उदय पास्ते, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सोनू गवस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख मंगेश पाटील, नगरसेवक संतोष नानचे, वैभव इनामदार, नगरसेविका संध्या प्रसादी, कळणे सरपंच अजित देसाई, शिवशंभु प्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष प्रकाश गवस, मदन राणे, संदेश राणे, दिलखुष माजिक, ॲड. दाजी नाईक, प्रदीप गावडे यांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.













