नवीन पिढी या खेळापासून अनभिज्ञ
चिपळूण (वार्ताहर): कोकणात वर्षानुवर्षे विविध सण, उत्सव आणि देशी मैदानी खेळ पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र होळी सुरू झाली की दहा दिवस संपूर्ण कोकणात हमखास खेळला जाणारा आट्यापाट्या हा पारंपरिक खेळ सध्या काळाच्या ओघात हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवीन पिढीला याबाबत काहीच ज्ञान नसल्याचे बोलले जात आहे.
आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील काही जिल्हामध्ये खेळला जाणारा एक जुना व लोकप्रिय मैदानी खेळ आहे. अनेक राज्यांत तो वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो.
या खेळाचे स्वरूप अत्यंत चैतन्यपूर्ण आहे. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक चौकोनी जागेत अडवणे, कोंडी करणे आणि अडवलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देत निसटून जाणे, असा सारा थरार अनुभवायला मिळतो. एकमेकांच्या पाठी लागणे, पाठ शिवणे, कोंडी करणे, हुलकावणी देणे, शिवाशिवी अशा अनेक रंजक प्रकारांचा या खेळात समावेश असतो.
कोकणात होळी सुरू झाली की आट्यापाट्या खेळ रात्रीचा रंगतो. होळीच्या दिवशी या खेळाची सांगता होते. ग्रामीण भागात विशेषतः तरुण, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या आनंदात हा खेळ खेळत असत. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक खेळांच्या वाढत्या प्रभावामुळे आजची पिढी या खेळापासून दूर जात असल्याचे दिसून येते. आताची पिढी फक्त मोबाईल मध्ये गुंग असते.
सध्या परिस्थिती अशी आहे की अनेक मुला-मुलींना आट्यापाट्या हा खेळ माहितीच नाही. कसा खेळायचा, कुठे खेळायचा, त्याचे नियम व अटी काय आहेत, याचीही माहिती अनेकांना नाही. पूर्वीच्या पिढ्यांनी जपलेला हा मौल्यवान खेळाचा वारसा आज नामशेष होत चालला आहे.
हा पारंपरिक खेळ पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा खेळ नव्या पिढीला समजून सांगणे आणि खेळावयास लावणे महत्वाचे आहे. तरच आट्यापाट्या खेळ पुढील पिढीला कळेल.













