छप्परपट्टी धारकांच्या छप्परपट्टीत व स्थिर व अस्थिर हातगाडी धारक व्यावसायिकांच्या भाडयात वाढ करण्याचा निर्णय

नगर परिषदेच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन
राजापूर न.प. सर्वसाधारण सभा

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील छप्परपट्टीची परवानगी घेऊन व्यवसाय करणाऱ्या छप्परपट्टी धारकांच्या छप्परपट्टीत तसेच स्थिर व अस्थिर हातगाडी धारक व्यावसायिकांच्या भाडयात वाढ करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तर नगर परिषदेच्या स्थापनेला १५० वर्षे पुर्ण होत असल्याने या स्थापना दिनाचे औचित्य साधून १ एप्रिल ते ३१ मार्च या वर्षभराच्या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

राजापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. या बैठकीत शहरातील विविध विकास कामांना मंजूरी देतानाच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी भविष्यात शहरात तात्पुरत्या स्वरूपात छप्पर बांधून व्यवसाय करणाऱ्या व नगर परिषदेकडे छप्पर पट्टी भरणाऱ्या छप्पर पट्टी धारकांच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शहरात हातगाडया लावून व्यवसाय करणाऱ्या स्थिर व अस्थिर हातगाडी धारक व्यावसायिकांच्या भाडयात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

नगर परिषदेच्या मालकीच्या मच्छी व मटणमार्केटमधील गाळे हे त्तात्पुरत्या स्वरूपात दैनंदिन कर आकारणीवर भाडयाने देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, विरोधीगटनेते व मुख्याधिकारी यांच्या दालनांचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर शहरात जाहिरात फलक लावणेसाठी जागा निश्चिती करताना त्या ठिकाणी जाहिरात प्रसिध्दी करण्यासाठी कायमस्वरूपी फ्रेम तयार करण्याचे धोरण ठरविण्यात आले.

शहरातील अनधिकृत बांधकामाना शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी देवस्थान इनाम जागेत बांधकामाला परवानगी मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत असल्याचे एड. राहुल तांबे, सौरभ खडपे, सुबोध पवार यांनी निदर्शनास आणले. यावर हा विषय शासनाच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत आपण निर्णय घेऊ शकत नाही, मात्र याबाबत धोपेश्वर देवस्थान प्रशासकांशी चर्चा करण्याचा तसेच आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातुन हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रशासनाकडून बैठकीच्या अजेंटयासोबत टिपणी दिली जात नसल्याची तक्रार सुभाष बाकाळकर यांनी केली. यावर पुढच्या बैठकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी दिले.

हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत शहरातील नगर परिषद मालकीच्या शाळांचे सुशोभिकरण व नुतनीकरण करतानाच गणेशघाट ते कोंढेतड पुलापर्यंत च्या भागाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, गटनेते एड. जमिर खलिफे, सुलतान ठाकूर, सुबोध बाकाळकर, महेश शिवलकर, अमिना गडकरी, शबाना मुल्ला, अफरोज झारी यांसह विरोधी गटनेते एड. राहुल तांबे, सौरभ खडपे, दिलीप अमरे, सुभाष बाकाळकर, प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, उर्मिला बाकाळकर, दिलीप चव्हाण, सौरभ पेणकर यांसह सदस्यांनी सहभाग घेत आपली मते मांडली.

नगर परिषद प्रशासकिय इमारती सौरउर्जेवर करण्याचा निर्णय शासनाकडून जास्तीत जास्त सौरउर्जा वापराचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचा विचार करून भविष्यात नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीसह, घनकचरा प्रकल्प, अग्नीशामक इमारत, बहुउद्देशीय सभागृह यांसह अन्य ठिकाणी सौर पॅनेल बसविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या उध्दट वर्तनाचे सभेत पडसाद
प्रशासनातील काही कर्मचारी नगरसेवकांशी उध्दट वर्तन करत असल्याची बाब पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी सभागृहात निदर्शनास आणली. यावर सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशि मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. यावर नगराध्यक्षा एड. खलिफे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सुचना देण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांना दिले. लोकप्रतिनिधींशी कोणत्याही कर्मचाऱ्याने गैरवर्तन केले, उपमर्द केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असा ईशारा यावेळी एड. खलिफे यांनी दिल्या.