ड्रोनच्या साहाय्याने मृतदेहाचा शोध
आंबोली | प्रतिनिधी :
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आंबोली घाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली गावठणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय ३१) या डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे बाराशे फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा शोध लावण्यात यश आले आहे.
राजाराम कुडतरकर हा तरुण मायकल डिसोजा यांच्या मालकीचा डंपर चालवत होता. सोमवारी रात्रीपासून हा डंपर आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या परिसरात उभा होता. रात्रभर डंपर एकाच ठिकाणी उभा असल्याचे आणि चालक राजाराम याचा कोणताही पत्ता लागत नसल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आला. त्यांनी तातडीने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.
दरीत शोध घेणे कठीण असल्याने डिसोजा यांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्याचे ठरवले. ड्रोनद्वारे घाटातील खोल दरीमध्ये पाहणी केली असता, सुमारे बाराशे फूट खोलीवर एका तरुणाचा मृतदेह अडकल्याचे दिसून आले. हा मृतदेह राजाराम याचाच असल्याची खात्री पटल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली.
राजारामने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे आंबोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











