खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील युवा उद्योजक तथा जामगे गावचे सुपुत्र शैलेशदादा कदम यांना खेड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने “युवा उद्योजक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अत्यंत कमी वयात उद्योग क्षेत्रात पदार्पण करत शैलेशदादा कदम यांनी आपल्या कर्तृत्व, मेहनत आणि दूरदृष्टीच्या बळावर व्यवसाय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, नियोजनबद्ध कामकाज आणि आधुनिक विचारसरणीमुळे त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार करत अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत खेड शहर मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांना युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शैलेशदादा कदम हे जामगे गावचे सुपुत्र असून ते रामदासभाई कदम यांचे पुतणे तसेच राज्याचे गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे चुलत बंधू आहेत. कुटुंबातील सामाजिक व राजकीय परंपरेचा वारसा जपत त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपली वेगळी छाप उमटवली आहे. समाजाप्रती असलेली आपुलकी आणि जबाबदारी जपत त्यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे.
या सन्मान सोहळ्यावेळी खेड शहर मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष शरद शिर्के, उपनगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, तसेच अंकुश विचारे, रोहन विचारे, दिपक नलावडे, सुनिल सावंत, सुनिल साळोखे, राजू आंब्रे, संदीप नायकवडी, प्रशांत सावंत, सुरेश चिकणे, मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शैलेशदादा कदम यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे येत स्वबळावर उभे राहावे आणि समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सन्मानामुळे खेड तालुक्यासह जामगे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शैलेशदादा कदम यांच्या यशामुळे अनेक तरुणांना उद्योग क्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळत आहे.













