मध्य पूर्वेतील तणाव: रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित; माहिती देण्याचे आवाहन

रत्नागिरी: मध्य पूर्व (Middle East) आणि परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता, रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित या देशांमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही माहिती आवश्यक असल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा.

मंत्रालयाशी थेट समन्वय

या संदर्भात मुंबई येथील मंत्रालय आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधण्यात आला आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेली माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाला कळवण्यात येईल. त्यानंतर तेथील भारतीयांच्या सुरक्षिततेबाबतची माहिती प्राप्त करून संबंधित नातेवाईकांना दिली जाईल.

ही माहिती देणे आवश्यक:

ज्या नागरिकांचे नातेवाईक मध्य पूर्वेतील देशांमध्ये (उदा. UAE, दुबई इ.) अडकले आहेत किंवा तिथे वास्तव्यास आहेत, त्यांनी प्रशासनाला खालील माहिती पुरवावी:

  1. व्यक्तीचे संपूर्ण नाव व रत्नागिरीतील पत्ता (पीन कोडसह).

  2. संपर्क क्रमांक (मोबाईल, व्हॉट्सॲप आणि ई-मेल).

  3. पासपोर्ट क्रमांक आणि पासपोर्ट बायोडेटाची झेरॉक्स प्रत.

  4. संबंधित देशातील (उदा. UAE) स्थानिक संपर्क क्रमांक व सध्याचे ठिकाण.

  5. व्हिसाचा प्रकार (पर्यटक/निवासी) आणि व्हिसा संपण्याची अंतिम तारीख.

  6. तिथे भेडसावणारी मुख्य अडचण.

  7. भारतातील/रत्नागिरीतील नातेवाईकांचा संपर्क क्रमांक.

येथे संपर्क साधा:

नागरिकांनी मदतीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

  • जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी (नियंत्रण कक्ष): 02352-222233 / मोबाईल: 7057222233

  • रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष: 02352-222222

  • मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई: 022-22027990 / मोबाईल: 9321587143

युद्धजन्य परिस्थितीची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.