कोकण विकासाच्या नवीन पर्वाला सुरुवात…….

एम टू एम रोरो बोटीचे विजयदुर्ग बंदरात जंगी स्वागत

बंदर विकास मंत्री नितेश राणेंची स्वप्नपूर्ती

विजयदुर्ग( प्रतिनिधी ) : विजयदुर्गवासीयांच्या प्रचंड गर्दीत एम टू एम प्रिन्सेस रो रो बोट दुपारी ४-३० वाजता विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. जुन्या आठवणी जिवंत करणारा त्याच आवाजातील बोटीचा भोंगा वाजला आणि एकच जल्लोष झाला. मुंबई भाऊचा धक्का येथे हिरवा झेंडा दाखवून रो रो बोटीचे उद्घाटन बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सकाळी ९ वाजता केले होते. या बोटीतून माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रमोद जठार तसेच विजयदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई येथील चाकरमानी, भाजपचे पदाधिकारी यांनी उद्घाटनाच्या बोटीतून मोफत प्रवास केला. बोटीच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डेप्युटी सुपरिटेन्डेड पोलीस श्री. दहिकर, प्रांताधिकारी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा भाजप उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, जि.प. सदस्य संजय बोबडी, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, विजयदुर्ग भाजपा शक्ती केंद्रप्रमुख प्रसाद देवधर, ग्रामपंचायत सदस्य शुभा कदम, दिनेश जावकर, प्रतीक्षा मिठबावकर, पूर्वा लोम्बर, तसेच ग्रेसीस फर्नांडिस, संजना आळवे, अंकुश टुकरुल, भूषण पोकळे, प्रदीप साखरकर, पोलीस पाटील राकेश पाटील, विजयदुर्ग बंदर अधिकारी उमेश महाडिक, मालवण बंदर अधिकारी रजनीकांत पाटील आणि शेकडो कोकण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयदुर्ग पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी बोटीतून प्रवास करणाऱ्या मान्यवरांना आणि प्रवाशांना मानवंदना दिली. यावेळी विजयदुर्ग जेटी तसेच बंदरामध्ये जाणार संपूर्ण रस्ता माणसानी फुलून गेला होता. या बोटीतून ३९० प्रवासी, ४१ फोर व्हीलर गाड्या आणि १७ टू व्हीलर गाड्या समाविष्ट होत्या.

पुन्हा एकदा ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. १९९० पर्यंत कोकण सेवक आणि कोकण शक्ती या बोटी विजयदुर्ग बंदरात यायच्या. त्यावेळी त्या बाहेर समुद्रात थांबायच्या आणि खपाट्याद्वारे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सेवा विजयदुर्ग बंदरात चालायची. मात्र आता नितेश राणे यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेली ही बोट विजयदुर्ग धक्क्याला लागली हे फार मोठे भाग्य असल्याची प्रतिक्रिया जुन्या जाणत्या लोकांनी दिली.