रत्नागिरी ः प्रतिनिधी
ऑनलाईन वेबसाईटवर झालेल्या ओळखीतून शहरातील एकाला दोघांनी तब्बल 22 लाख 21 हजार 400 रुपयांचा चुना लावला. ही घटना 22 जुलै 2025 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीत घडली आहे. संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिआगो फर्गोरा (युनायटेड किंगडम इंग्लंड) आणि पासपोर्ट एमिग्रेशन ऑफीसर प्रिया शर्मा (दिल्ली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सलील अब्दुल कादीर काझी(45,रा.पडवेकर कॉलनी उद्यमनगर,रत्नागिरी) यांनी रविवार 1 मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सलील काझी यांची दोन्ही संशयितांशी ऑनलाईन वेबसाईटवर ओळख झाली होती. यातील टिआगो फर्गोरा याने फिर्यादीला आपण दिल्ली येथील एमिग्रेशनच्या ठिकाणी 60 हजार युके पाउंड हे परदेशी चलन व सोन बेकायदेशिरपणे बाळगल्यामुळे अडकल्याचे सांगितले. त्यानंतर ती रक्कम आणि सोन भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी त्याने फिर्यादीला 22 लाख 21 हजार 400 रुपये पाठवण्यास सांगितले.
यात संशयित टिआगो फर्गोरा याला साथ देत संशयित प्रिया शर्मा हिने आपण दिल्ली येथील एमिग्रेशन ऑफीसर असल्याची फिर्यादी सलील काझीला बतावणी केली होती. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तसेच टिआगो फर्गोराने पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे फिर्यादीने आपल्या दोन बँक खात्यातून संशयितांना पैसे पाठवले. परंतू 6 महिन्यांचा काळ लोटूनही संशयितांनी पैसे परत न केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी काझी यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव धेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.













