गटविकास अधिकारी मा.श्री.प्रशांत राऊत करतायत भ्रष्टाचारी ठेकेदार आणि पालशेत ग्रा.पं.ची पाठराखण?

Google search engine
Google search engine

पालशेत मधील शौचालय दुरुस्ती घोटाळा!

ग्रा.पं.सदस्य तथा शिवसेना शाखा प्रमुख मिनार पाटील करणार २जानेवारीला आमरण उपोषण!

पालशेत | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत – निवोशीच्या हद्दीतील शौचालय दुरुस्ती घोटाळ्याबाबत १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र/निवेदन आणि तोंडी माहिती देऊनही भ्रष्टाचारी ठेकेदार आणि पालशेत ग्रा. पं.पदाधिकाऱ्यांची गटविकास अधिकारी पंचायत समिती,गुहागर हे पाठराखण करीत आहेत का?असा सवाल उपस्थित करतानाच याबाबत दि.३०डिसेंबरपर्यंत सक्षम अधिकाऱ्यांनी सदर कामांची तक्रारदार ग्रामस्थांसह पाहणी करून त्याचा लेखी अहवाल जागेवर न केल्यास २जानेवारी २०२२ रोजी पंचायत समिती,गुहागर कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा ग्रा.पं.सदस्य तथा शाखाप्रमुख मिनार पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करता ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण देऊन १८ डिसेंबर रोजी या विषयामध्ये लक्ष देतो.असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.मात्र प्रत्यक्षात १६ डिसेंबर रोजी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या कोणा अधिकाऱ्यांनी संबंधित तीनही शौचालयांची तक्रारदारांना विश्वासात न घेता,न बोलावता पाहणी केली यावरूनच गटविकास अधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि ग्रामपंचायत पालशेत पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करतायत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण संबंधित शौचालय दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे लावलेले फलक पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर बदलण्यात आलेले आहेत याचाच अर्थ याबाबतची सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांनीच भ्रष्ट ठेकेदार आणि पालशेत ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांना दिली असण्याची दाट शक्यता आहे.

मिनार पाटील आणि सहकार्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे संबंधित कामांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती.मात्र सर्व कामे पाहून आल्याचे सांगत तक्रारदारांची मागणी फेटाळून लावली परंतु त्याच वेळी सर्व कामे योग्य झाली आहेत का याबाबत काहीच भाष्य केले नाही.स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यापासून ते पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच याबाबत जबाबदार असलेले संबंधित एकतर कोणाच्या तरी दबावाखाली आहेत किंवा या सर्वांची या प्रकरणामध्ये टक्केवारी साठी केलेली मिलीभगत आहे.असाच एकमेव अर्थ या सगळ्यातून निघतो.दिलेली मुदत संपून गेल्यावरही या गंभीर विषयाची दखल गटविकास अधिकारी घेऊ इच्छित नाहीत किंवा जाणीवपूर्वक त्यांना ती घ्यायची नाही असे दिसून येत असल्याने ३०डिसेंबर पर्यंत सदरच्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी सक्षम अधिकाऱ्यांनी तक्रारदार आणि ग्रामस्थांसह न केल्यास तसेच त्याचा लेखी अहवाल जगेवरतीच न केल्यास २ जानेवारी २०२२ रोजी पंचायत समितीच्या गैर कारभारचा तसेच ग्रामपंचायतींना भ्रष्टाचाराचे अड्डे बनविण्यासाठी आणि भ्रष्टाचारी ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी मदत करणाऱ्या पंचायत समिती अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी ग्रा.पं.सदस्य तथा शाखाप्रमुख मिनार पाटील आणि सहकारी पंचायत समिती,गुहागर कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.