नवानगर येथे कारची सिमेंटच्या मोरीला धडक, चालक किरकोळ जखमी

दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील नवानगर येथे आज गुरुवार ५ मार्च रोजी सकाळी सुमारे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कारचा अपघात झाल्याची घटना घडली. दापोली येथून खेडकडे पालखीला जात असताना ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोरीला जोरदार धडकली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवानगर परिसरातील रस्ता अरुंद असून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या मोरीमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान संबंधित कार चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोरीवर जाऊन आदळले आणि हा अपघात घडला.
या अपघातात कारमधील चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, नवानगर परिसरात रस्त्याची कामे सुरू असताना रस्त्याच्या कडेला ठेवलेली सिमेंटची साधने तसेच अरुंद रस्ता यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी रस्त्याच्या कामांदरम्यान आवश्यक सूचना फलक नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने सूचना फलक लावून आणि योग्य सुरक्षिततेची उपाययोजना करून वाहनचालकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.