सावंतवाडी | प्रतिनिधी:
येथील पंचायत समितीसमोर एका गर्भवती महिलेने आपल्या हक्काच्या नोकरीसाठी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. वरिष्ठ कार्यालयाचे स्पष्ट आदेश असूनही ग्रामपंचायत स्तरावर ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वैभवी प्रशांत साटेलकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ८ मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी हे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
वैभवी साटेलकर यांची ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेश संबंधित ग्रामपंचायतीला दिले होते. मात्र, स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील दिरंगाईमुळे त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी अखेर हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
वैभवी साटेलकर या गर्भवती आहेत. या नाजूक अवस्थेत उपोषणाला बसणे त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी जोखमीचे आहे. “जर उपोषणामुळे माझ्या किंवा माझ्या बाळाच्या जिवाला काही धोका निर्माण झाला, तर त्याला सर्वस्वी सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक कुबल आणि विद्यमान ग्रामसेवक सावंत हेच जबाबदार राहतील,” असा इशारा साटेलकर यांनी दिला आहे.
एकीकडे शासन महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे एका गर्भवती महिलेला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते, याबद्दल संताप व्यक्त होत आहे. जागतिक महिला दिनीच हे आंदोलन होणार असल्याने प्रशासनाची मोठी नाचक्की होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन त्यांना उपोषणापूर्वी न्याय देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home ताज्या घडामोडी डाटा एंट्री ऑपरेटर पदावर रुजू करण्यास टाळाटाळ प्रकरणी गर्भवती महिलेचा उपोषणाचा इशारा













