खेड (प्रतिनिधी): मुंबई–गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथील गोसावी स्टॉपजवळ सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास आयशर आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात आयशर चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून लोटच्या दिशेने आयशर वाहन क्रमांक MH 08 W 8451 जात असताना कापसाळ गोसावी स्टॉपजवळ पुढे जाणाऱ्या कंटेनरला आयशरने मागून धडक दिली. धडकेनंतर आयशर चालक युसुफ सोलकर, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी हे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानची २४ तास अपघात सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सत्यम पवार यांनी जखमी युसुफ सोलकर यांना त्वरित रुग्णवाहिकेतून चिपळूण येथील लाईक केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
महामार्गावर अपघात झाल्याने काही काळ घटनास्थळी वाहनांची वर्दळ वाढली होती. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तसेच कंटेनर चालकाची ओळख आणि त्याच्याविरोधात पुढील कारवाई याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे. अपघातातील वाहनांचे नुकसान आणि घटनेची अधिकृत माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.












