छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जतन करण्याचे दृष्टीने पहिले पाऊल

राजापूर ब्रिटीशकालीन वखार परिसरात सुरू असलेले सुशोभिकरणाचे काम.
राजापूरच्या ब्रिटिशकालीन वखार (गढी) परिसराचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्यात
संतोष मोंडे | राजापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारी राजापूरची ऐतिहासिक ‘इंग्रज वखार’ परिसर आता कात टाकत आहे. शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मंजूर झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ही वास्तू एका नव्या रूपात राजापूरवासीयांच्या आणि पर्यटकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेली ही वखार नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र, छ. शिवस्मारक जीर्णोद्धार समिती, शिवप्रेमी आणि ‘माय राजापूर’ या संस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. भाजपाचे नेते व कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रयत्नातून शासनाने या कामाला गती दिली असून, उमाकांत माधलकर अँड सन्स यांच्यामार्फत हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ब्रिटीशांच्या कालावधीत निर्माण झालेली राजापूरची वखार म्हणजे एकेकाळी राजापूरची शान होती. सुरूवातीपासूनच चालू-बंद असलेली ही वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी येथून इंग्रजांचा बिमोड केल्यानंतर अल्पावधीतच बंद पडली. त्यानंतरही गेली अनेक वर्षे तिचे अस्तित्व दिसून येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातत्व विभागाचे याकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे ही वखार नामशेष झाली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून शिवप्रेमींनी ब्रिटीशकालीन वखारीच्या पुनरूज्जीवनाचा विषय हाती घेतला आहे. ऐतिहासिक ठेवा म्हणून वखारीचे पुनरूज्जीवन करताना या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे.
गतवर्षी मार्च  महिन्यात वखारीच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर आराखडा तयार करून आता प्रत्यक्ष कामाला देखील सुरूवात झाली होती. उमाकांत माधलकर अन्ड सन्स या कंपनीकडून हे काम हाती घेण्यात आले  आहे. सुशोभिकरणात सद्यस्थितीत परिसरात सुस्थितीत असलेल्या जुन्या कचेरी इमारतीचे मजबुतीकरण व सुशोभिकरण, नव्याने स्वच्छतागृह, एम्पी थिएटर, पार्कींग, गेट, कट्टे, पायऱ्यांची निर्मीती तसेच ज्येष्ठ नागारिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर इमारत परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ही कामे मार्गी लागली आहेत. तर शिवकालीन प्रसंगावर आधारीत म्युरल पेंटस्, चित्रफित गॅलरी, एम्बॉस पेंटस् साकारली जाणार आहेत. तर परिसरात नेत्रदिपक विद्युत रोषणाई व रंगकाम ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सुशोभिकरणानंतर या ऐतिहासिक वास्तूला नवा साज चढणार आहे.
इ.स. १६४९ मध्ये बांधलेली ही वखार इंग्रजांच्या कुटिलनीतीचे केंद्र होती. पन्हाळगडाच्या वेढ्यात इंग्रजांनी सिद्दी जोहरला तोफा पुरवून गद्दारी केली होती. याचाच बदला घेण्यासाठी १६६१ मध्ये शिवरायांनी राजापूरवर स्वारी करून या वखारीचा गर्वहरण केला होता. हाच जाज्वल्य इतिहास आता या सुशोभीकरणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीसमोर येणार आहे.
या ऐतिहासिक वास्तूच्या पूर्णतः पुनरुज्जीवनासाठी ‘जागेचा प्रश्न’ हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. ही जागा सध्या ‘पोलीस अधीक्षक, रत्नागिरी’ यांच्या मालकीची असून, शहर विकास आराखड्यात तिचे आरक्षण ‘मनोरंजनात्मक वापरासाठी’ आहे. ही तांत्रिक अडचण दूर झाल्याशिवाय मूळ वखारीचे हुबेहूब पुनरुज्जीवन करणे कठीण जात आहे. त्यामुळे शासन स्तरावर जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहे.
“छ. शिवरायांच्या पराक्रमाची प्रतिक असलेली ब्रिटीशकालीन वखार ही वास्तू नव्याने उभारून हा ऐतिहासिक वारसा जपणे हे समस्त शिवप्रेमींचे स्वप्न आहे. परंतु त्यासाठी वखारीच्या जागेच्या संदर्भात असलेले जटील प्रश्न सुटणे आवश्यक आह”.
महेश मयेकर, अध्यक्ष छ. शिवस्मारक जिर्णोध्दार समिती
“माय राजापूर संस्थेने दिलेल्या आराखड्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे शासनाने आराखडा तयार करावा व आदर्श ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे. छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक व ऐतिहासिक वास्तु वारसा जपण्याबरोबर पर्यटन वाढीसाठी इंग्रज वखार ज्या जागेवर होती तेथेच, बाहेरून जुनी वखार जशी होती तशी बांधावी. आतील भाग हा समाजोपयोगी वापरात येईल”.- जगदीश पवार, अध्यक्ष माय राजापूर