ओझरेबुद्रुकमध्ये रंगला शिंब्रादेवी आणि फोक्राई देवीचा पालखी भेट सोहळा

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या ओझरे बुद्रुक येथे ओझरेची ग्रामदैवत आई शिंब्रादेवी आणि निनावे गावची ग्रामदेवता आई फोक्राई देवी या दोन बहिणींचा ऐतिहासिक पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. दरवर्षीप्रमाणे ओझरे बुद्रुक येथील होळीच्या माळावर हा पालखी भेट सोहळा संपन्न झाला. “आई साहेबांच्या नावाने होणारा जयघोष, फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात दोन्ही पालख्या एकमेकींना भेटल्या. हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह परराज्यातूनही हजारो भाविकांनी गर्दी केली होती.पालख्यांची भेट झाल्यानंतर परंपरेनुसार दोन्ही पालख्या होळीच्या माळावर विराजमान झाल्या. त्यानंतर विधीवत जपसाल आणि नैवेद्य दाखवून दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली.

दोन्ही देवींना ‘जागृत देवस्थान’ आणि ‘नवसाला पावणारी माता’ म्हणून ओळखले जाते.आपल्या संकट काळात देवीने नेहमीच रक्षण केल्याची भावना येथील ग्रामस्थांमध्ये आहे. हीच श्रद्धा उराशी बाळगून भाविकांनी दर्शनासाठी मैलोन् मैल लांब रांगा लावल्या होत्या. या उत्सवाचे नेटके नियोजन ग्रामविकास मंडळ ओझरे बुद्रुक (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आले होते. मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने हा उत्सव समाजासमोर एक आदर्श ठेवणारा ठरला. यावेळी उपस्थित मान्यवर अध्यक्ष दत्ताराम जयराम हातीम, सरचिटणीस श्रीकांत श्रीपत हातीम, कार्याध्यक्ष विश्वनाथ गणपत लाड, खजिनदार दीपक काशीराम हातीम व संपूर्ण कार्यकारिणी, मानकरी, गावकर, पुजारी, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.