ढोल ताशांचा गजर : अबालवृद्धांच्या जल्लोष
सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकणची परंपरा आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या ऐतिहासिक सावंतवाडी शहरात शुक्रवारी पाच दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता ‘रंगपंचमी’ने अत्यंत उत्साहात करण्यात आली. “यंदाची होळी, रंगांनी न्हाली” असाच काहीसा प्रत्यय शहरात ठिकठिकाणी येत होता. बच्चे कंपनीचा उत्साह, तरुणाईचा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या गजरात अवघे सावंतवाडी शहर रंगात न्हाऊन निघाले होते.

सावंतवाडी शहरात होळीचा उत्सव पाच दिवस साजरा करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. पाचव्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या रंगपंचमीकडे संपूर्ण शहराचे डोळे लागलेले असतात. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात या सणाची लगबग पाहायला मिळत होती. दुपारनंतर तर उत्साहाला उधाण आले. गल्लीबोळांपासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत सर्वत्र रंगांची उधळण सुरू होती. मात्र, संपूर्ण बाजारपेठ बंद होती. तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील पहायला मिळाला.
तरुणाईचा जल्लोष, महिलांचाही सहभाग
यंदाच्या रंगपंचमीमध्ये तरुणाईचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. दुचाकीवरून रंगांची उधळण करत फिरणारी तरुणाई आणि ठिकठिकाणी सुरू असलेला डीजे व ढोल-ताशांचा गजर यामुळे वातावरणात कमालीचा चैतन्य निर्माण झाले होते. केवळ तरुणच नव्हे, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही आपापल्या सोसायट्यांमध्ये एकत्र जमून रंगांचा आनंद लुटला. एकमेकांना गुलाल लावून आणि पाण्याचे फुगे मारून बच्चे कंपनीने रस्त्यावर एकच गर्दी केली होती.

बाजारपेठेत शुकशुकाट, रस्त्यांवर रंगांची उधळण
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुपारनंतर बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवली होती. सकाळी काही वेळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या, मात्र दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट होता. हा शुकशुकाट केवळ दुकानांपुरताच मर्यादित होता, कारण रस्त्यांवर मात्र रंगात माखलेल्या नागरिकांची मोठी वर्दळ दिसत होती.
रंगाचा उत्सव व सांस्कृतिक रंग
काही ठिकाणी पारंपारिक वाद्यांच्या तालावर नृत्याचा ठेका धरत नागरिकांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. सायंकाळी उशिरापर्यंत रंगांचा हा खेळ सुरू होता. ‘बुरा ना मानो होली है’च्या घोषणा आणि रंगात न्हालेली सुबक सावंतवाडीची चित्रे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. सायंकाळी उशिरा मोती तलावाच्या काठावरून टेम्पोतून मिरवणुकाही काढण्यात आल्या. येथील इस्वटी महापुरुष देवस्थानकडील रोंबाट परंपरेनुसार होळीचा खुंट येथे पोहचल्यावर उत्सवाची सांगता करण्यात आली.













