माणुसकीची ‘समिधा’ अर्पण करणारा स्मशानातील देवदूत मारुती निरवडेकर यांचा ‘सुंदरवाडीकर’तर्फे सन्मान

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व केवळ पात्रे आहोत,’ असे जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपिअरने म्हटले होते. मात्र, या रंगभूमीचा शेवट जिथे होतो, त्या भयाण शांततेच्या स्मशानभूमीत गेली १२ वर्षे निष्ठेने माणुसकीची सेवा देणारे मारुती निरवडेकर यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श उभा केला आहे. ज्या ठिकाणी पाऊल ठेवतानाही सर्वसामान्य कचरतात, तिथे माणुसकीचा नंदादीप तेवत ठेवणाऱ्या या ‘मृत्युंजय’ दूताचा नुकताच सावंतवाडीतील ‘सुंदरवाडीकर’ ग्रुपच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.

कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, तर ते किती निष्ठेने केले जाते यावर त्या कामाचे मोल ठरते, हा वडिलांनी दिलेला कानमंत्र मारुती निरवडेकर यांनी आयुष्यभरासाठी शिरसावंद्य मानला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सूचनेवरून त्यांनी नगरपालिका स्मशानभूमीत सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजतागायत ही सेवा अविरत सुरू आहे.

*कोरोना काळातील ‘रक्तविरहित’ नाते”

जगावर जेव्हा कोरोनाचे संकट ओढवले होते, तेव्हा रक्ताची नातीही भीतीपोटी दुरावली होती. अशा अत्यंत कठीण काळात निरवडेकर यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सुमारे ६,००० कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मदत केली. जात, धर्म आणि पंथ या पलीकडे जाऊन केवळ ‘माणुसकी’ हाच धर्म त्यांनी जपला आहे. आजवर त्यांनी तब्बल १२,००० हून अधिक पार्थिवाना अग्नी देण्यासाठी सहाय्य केले आहे.

स्मशानातील ‘लक्ष्मी-नारायण’

निरवडेकर यांच्या या कठीण प्रवासात त्यांच्या पत्नीनेही सावलीसारखी साथ दिली आहे. स्मशानभूमीत स्वच्छता राखणे, झाडांची निगा राखणे ही कामे ही ‘लक्ष्मी-नारायणाची’ जोडी आनंदाने करते. याच कामाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले असून, आज त्यांची मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत. कष्टाच्या भाकरीतून त्यांनी संसाराचे नंदनवन फुलवले आहे.

स्मशानातील आगळीवेगळी दिवाळी

जेव्हा संपूर्ण जग दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघत असते, तेव्हा निरवडेकर स्मशानातील मृतात्म्यांना चिरशांती मिळावी म्हणून तिथे दिव्यांची आरास करून ‘स्मशान दिवाळी’ साजरी करतात. त्यांच्या या संवेदनशील कृतीने अनेकांच्या डोळ्यांत पाणी उभे राहते.

कृतज्ञता सन्मान

ॲड. देवानंद मणेरीकर आणि ‘सुंदरवाडीकर’ ग्रुपच्या वतीने मारुती निरवडेकर यांचा रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

“तुम्ही समाजासाठी काय केले, यावरच तुमचे अस्तित्व अवलंबून असते. निरवडेकर यांना कदाचित मंत्र येत नसतील, पण अंत्यसंस्काराचे ‘तंत्र’ आणि मृतांच्या नातेवाईकांना ‘धीर’ देण्याचे पुण्यकर्म ते मोठ्या निष्ठेने करत आहेत,” अशा शब्दांत यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या सोहळ्याला संप्रवी कशाळीकर, सीमा मठकर, अभय पंडीत, संतोष मुंज, सुनील कोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्मशानातील या निस्वार्थ सेवेची दखल घेतल्याने सावंतवाडी परिसरातून ‘सुंदरवाडीकर’ ग्रुपचे कौतुक होत आहे.