कुडाळ :
जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळ तालुक्यातील कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ७ मार्च रोजी कसाल बाजारपेठ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता उद्घाटन व सत्कार समारंभाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा, ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, १२ वाजता फनी गेम्स, दुपारी १ वाजता अल्पोपहार, दुपारी २ वाजता ‘खेळ पैठणीचा’, सायंकाळी ५ वाजता हळदीकुंकू समारंभ, तर सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण व समारोप होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर असणार आहेत. यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष कांदळकर, मुख्याध्यापक उत्तम मालगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मालकर, प्रसार केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर, सरपंच राजन परब, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.












