आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर ग्रामीण रूग्णालयातील रक्त संकलन केंद्राला अखेर शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.. राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या आरोग्य सेवेत यामुळे भर पडली असून गेल्या कित्येक वर्षाची मागणी पुर्ण झाली आहे. याबाबत शासन स्तरावर पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने शासनाने या रक्त साठवण केंद्राला मंजूरी दिली आहे. याबाबत ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यिकय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राजापूर तालुक्यात रक्तपेढी किंवा रक्त साठवण केंद्र नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला तसेच तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. बहुतांश वेळा रुग्णांच्या नातेवाईकांना रत्नागिरी, कोल्हापूर किंवा इतर शहरांमध्ये जाऊन रक्ताची व्यवस्था करावी लागत होती. त्यामुळे अनेकदा उपचार प्रक्रियेत विलंब होत असल्याची तक्रार होत होत्या.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी आरोग्य विभाग तसेच शासन स्तरावर याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे रक्त साठवण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी अनेक बैठका, पत्रव्यवहार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाने रक्त साठवण केंद्रार अधिकृत मान्यता दिली आहे.
राजापूर ग्रामीण रूग्णालयातील या रक्त साठवण केंद्राच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच रक्त उपलब्ध होणार आहे. विशेषतः अपघात, प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत तसेच गंभीर आजारांमध्ये तातडीने रक्ताची गरज भासल्यास हे केंद्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राजापुर तालुक्यातील आरोग्य विषयक सेवा सुधारण्यासाठी आ. किरण सामंत यांनी विशेष प्रयत्न हाती घेतलेले आहेत. त्यात आता राजापूर ग्रामीण रूग्णालयात हे रक्त संकलन केंद्र मंजूर झाल्याने आरोग्य विषय सेवेत भर पडली आहे. भविष्यातही अधिक चांगल्या सेवा सुविधा आरोग्य विभागात निर्माण करण्यासाठी आ. सामंत हे पाठपुरावा करणार आहेत.












