रत्नागिरी ग्राहक पेठच्या भव्य प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : महिलांना उद्योगिनी बनवताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे गेले १८ वर्षे काम करणाऱ्या रत्नागिरी ग्राहक पेठच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

या वेळी रत्नागिरीच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रीती सुर्वे यांनी फित कापून उद्घाटन केले तर या वेळी पावस गणांतून निवडून आलेल्या आणि रत्नागिरी ग्राहक पेठच्याच सदस्य असलेल्या स्वाती शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजशेखर मलुष्टे आणि जयेश मंगल पार्कचे व्यवस्थापक ओंकार रहाटे आणि ग्राहक पेठच्या संचालिका प्राची शिंदे, पालघरचे माजी नगरसेवक प्रल्हाद तथा बाबा कदम, श्री. तेंडुलकर आणि उद्योगिनी महिला उपस्थित होत्या.

उद्घाटक सौ. प्रीती सुर्वे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठच्या गेले १८ वर्षाच्या सातत्याचे कौतुक करताना महिलांना जिद्दीने त्यांच्या पायावर उभे करणारे हे व्यासपीठ असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या स्वाती शिंदे यांनी याच ग्राहक पेठमुळे माझ्यासारख्या गावात राहणाऱ्या महिलेला श्रीमती प्राची शिंदे यांनी पुढे येण्याची संधी दिली, इथली सुरुवातच आयुष्य बदलून गेली, उद्योगिनी आणि आता लोकप्रतिनिधी अशी ओळख मिळाली असे आवर्जून सांगितले.

अॅड. राजशेखर मलुष्टे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठ आणि प्राची शिंदे यांचे कौतुक केले. त्याचवेळी उपस्थिती उद्योगिनी महिलांना बचतीचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. या वेळी संचालिका प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मान केला. ९ मार्चपर्यंत हे प्रदर्शन व विक्री जयेश मंगल कार्यालय येथे चालू राहणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योगिनींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.