निवळी-बावनदी परिसरात ‘खैर’ तस्करांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेकायदेशिरपणे खैराच्या झाडांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवार 7 मार्च रोज्ाी सायंकाळी 5.10 वा.सुमारास निवळी बावनदी येथील रस्त्यावर करण्यात आली. संशयितांकडून लहान मोठ्या आकारातील 181 नग खैराची लाकडे आणि 2 चार चाकी वाहने असा एकूण 11 लाख 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अजित गंगाराम चव्हाण (26,रा.आंबडस,खेड),अरबाज हमीद सुर्वे (34,रा.गवळीवाडी घाणेखुंट,खेड) आणि अक्षय राजू चव्हाण (28,रा.भिंगळोली मंडणगड,रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात ग्रामीण्ा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 303(2),317(2),3(5) व भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)(ब),42 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध वुक्ष्ातोड व त्यांची बेकायदेशिर वाहतुक रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित गस्त व तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक निवळी-बावनदी येथील रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना बोलेरो पिकअप (एमएच-14-एचजी-7338) व टाटा योध्दा (एमएच-08-एपी-4339) या दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांची 181 लाकडे मिळून आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे,पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर,सहाय्यक पोलिस फौजदार सुभाष भागणे,पोलिस हेड काँस्टेबल नितीन डोमणे,भैरवनाथ सवाईराम व चालक पोलिस काँस्टेबल अतुल कांबळे यांनी केली.