दोडामार्ग | सुहास देसाई :दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया आज पंचायत समिती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे, महायुतीने या निवडीवर आपले वर्चस्व कायम राखले असून, सभापती पदी माटणे गणाच्या सौ. पार्वती महादेव गवस (भाजप) यांची, तर उपसभापती पदी कोलझर गणाचे गणेशप्रसाद गवस (शिवसेना) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरली.
सत्तेचे समान वाटप: सव्वा-सव्वा वर्षांचे सूत्र
दोडामार्ग तालुक्यातील मतदारांनी सहाच्या सहा जागांवर महायुतीला कौल दिला होता. यामध्ये भाजपचे ३ आणि शिवसेनेचे ३ उमेदवार निवडून आले आहेत. महायुतीच्या नेत्यांनी ठरवलेल्या सूत्रानुसार सत्तेचे वाटप करण्यात आले आहे:
पहिला टप्पा (सव्वा वर्षे): सभापती पद भाजपकडे, तर उपसभापती पद शिवसेनेकडे.
दुसरा टप्पा (सव्वा वर्षे): सभापती पद शिवसेनेला, तर उपसभापती पद भाजपकडे जाणार आहे.
या नियोजित सूत्रामुळे निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना आगामी काळात कामाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते













