महिला सन्मान सप्ताहाचे खेड नगरपरिषदेत आयोजन; महिला कर्मचाऱ्यांचा होणार गौरव

खेड (प्रतिनिधी) : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने नगरपरिषदेमध्ये “महिला सन्मान सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खेड नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी, स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या महिला तसेच खेड पोलीस स्थानकात आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती रसिका राकेश खेडेकर यांनी दिली.
या उपक्रमाचा उद्देश समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. नगरपरिषदेतील स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या महिला शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तर पोलीस विभागातील महिला कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना खेड नगरपरिषदेचे गटनेते निकेतन जी पाटणे यांनी महिलांना मिळालेल्या ५० टक्के आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, हे आरक्षण केवळ राजकीय आरक्षण नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी दिलेले आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत आपली कर्तबगारी सिद्ध केली असून समाजाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला खेडच्या प्रथम नागरिक माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ बापू चिकणे, गटनेते निकेतनजी पाटणे, तौसिफ खोत, स्वप्निल सैतवडेकर, प्रेमळ चिखली, राजेश बुडाला, यश खेडेकर, रसिका खेडेकर, नीता आंब्रे यांच्यासह खेड नगरपरिषदेच्या सर्व नगरसेविका आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.