नंदकुमार मोहिते यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

शिवार आंबेरे येथे प्रथम स्मृतिदिन सोहळा संपन्न
नंदकुमार मोहिते : निस्वार्थी आणि निर्भिड नेतृत्वाचा वारसा

रत्नागिरी: निस्वार्थी आणि निर्भिड समाजसेवक निसर्गवासी नंदकुमार मोहिते यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या भागातील सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय लोकांची एक समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून त्यांचे कार्य निरंतर पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी केले. शिवार आंबेरे येथील विद्या संकुल परिसरात ६ मार्च २०२६ रोजी आयोजित मोहिते साहेबांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी ओबीसी मूळनिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी श्रद्धांजली वाहताना मोहिते साहेबांच्या नेतृत्वाचा गौरव केला. राजकीय प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी समाजाची अहोरात्र सेवा केली असून त्यांचे विचार समाजात पेरण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मोहिते साहेबांनी केवळ संस्थात्मक बांधणी केली नाही, तर तिल्लोरी कुणबी समाजाला ओबीसी राजपत्रात स्थान मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक कायदेशीर लढा दिला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज कुणबी समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले आहे.

श्रमिक किसान सेवा समितीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी ‘दै. गुहागर सत्ता’चे संपादक राजेंद्र मांडवकर, तानाजी कुळये, संभाजी काजरेकर, ॲड. महेंद्र मांडवकर, जि.प. सदस्य प्रथमेश गावणकर यांसह अनेक मान्यवरांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मोहिते साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.