दोन संशयितांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी वन परिक्षेत्रातील मौजे चराठे येथील शासकीय वनातून सागाची बेकायदेशीर तोड करून तस्करी करणाऱ्या एका टोळीचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीचा शोध वन विभाग घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी चराठे येथील शासकीय वनात अज्ञात इसम झाडांची तोड करून माल पळवून नेण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी चराठे वनात दबा धरला. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास एक संशयित वाहन जाताना दिसताच वन कर्मचाऱ्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पळवून नेण्याचा प्रयत्न केला. वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून हे वाहन चराठे येथेच अडवले.
सदर आयशर गाडीची (क्र. एमएच ०७ पी ३२५८) तपासणी केली असता, त्यात बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जाणारा सागाचे ५ गोल नग (०.२३३ घनमूळ) माल आढळून आला. सदर वाहन भानुदास दत्ताराम देसाई (रा. माजगाव, हरसावंतवाडा) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने सावंतवाडी वन विभागाच्या मालकीच्या चराठे वन सर्वे नंबर २७० मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून सागाची झाडे तोडली होती आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तो माल वाहून नेत होता. वन विभागाने वाहन आणि माल जप्त करून उपरल विक्री आगारात जमा केला आहे.
या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी भानुदास दत्ताराम देसाई याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचा भाऊ भूषण दत्ताराम देसाई (रा. माजगाव) याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी वन विभागाने भूषण देसाई याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात बेकायदेशीर सागाच्या मालापासून बनवलेला १ सोफासेट, २ खुर्च्या, टिपॉय, ६ सागाचे गोल नग आणि चिरीव लाकडाचा मोठा साठा आढळून आला. हा सर्व मुद्देमालही वन विभागाने जप्त केला आहे. या गुन्ह्यात आणखी एक तिसरा आरोपी सामील असून वन विभाग त्याचा कसून शोध घेत आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१ ई, फ) आणि ४१ (२) ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वन विभाग करत आहे.
सदरची यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक श्री. मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजगावचे वनपाल श्री. प्रमोद राणे, कोलगाव उत्तरचे वनरक्षक श्री. अक्षय कुंभार, माजगावचे वनरक्षक श्री. सुशांत चोथे आणि मळगाव उत्तरचे वनरक्षक श्री. सुनील गडदे यांच्या पथकाने केली.













