घरात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली
कणकवली : कणकवली तालुक्यातील पिसेकामते गावठणवाडी येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे मोठे नुकसान झाले. या स्फोटात घरातील कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र घरातील अन्नधान्य, दागिने, कपडे, रोख रक्कम आदींसह एकूण ६ लाख २३ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिसेकामते गावठणवाडी येथील सुनील कृष्णा गुरव हे मंगळवारी नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी शेजारी असलेल्या मंदिराजवळ काम करत होती. त्यावेळी घराच्या दिशेने धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसत असल्याने त्या तातडीने घरी धाव घेतली. दरम्यान घरातील इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समोर आले.

या स्फोटामुळे घराच्या बाजूला असलेली पडवी पूर्णपणे जळून खाक झाली. घरातील अन्नधान्य, सिलेंडर, दागिने, कपडे, मंगळसूत्र, चैन, कानातली कुडी, पत्रे तसेच सुमारे ७० हजार रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, कणकवली पंचायत समितीचे उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, संकेत राणे, अनिल गुरव, नितीन मोहिते, सुहास कदम, आनंद गुरव, हनुमंत बोंद्रे, विजय सावंत, स्वरूप कोरगावकर, परेश कांबळी, रवींद्र जाधव यांच्यासह तलाठी नयन चौगुले, ग्रामसेविका शुभांगी जाधव, सरपंच प्राजक्ता मुद्राळे तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार स्वप्निल ठोंबरे, डीडी चव्हाण, किरण कदम आणि नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.












