मित्रमेळा तर्फे राजापूरात रविवार २२ मार्च रोजी ‘चैत्र पालवी’ गायन मैफलीचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): येथील मित्रमेळा राजापूर या संस्थेच्या वतीने वसंत ऋतूच्या स्वागतासाठी रविवार दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता राजापूर हायस्कुल कलामंदिर येथे ‘चैत्र पालवी’ या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राजापूर शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील रसिकांना दर्जेदार सांगीतिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांची सातत्याने मेजवानी देणारी ‘मित्रमेळा राजापूर’ ही संस्था गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने कार्यरत आहे. विविध कलाप्रकारांचे कार्यक्रम आयोजित करून रसिकांची अभिरुची जोपासण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही संस्थेमार्फत केले जात आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून ‘चैत्र पालवी’ या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बहारदार कार्यक्रमात रत्नागिरी येथील प्रसिद्ध व गुणी युवा कलाकार वैष्णवी जोशी नाट्यसंगीत आणि सुगम संगीत तसेच थोडं शास्त्रीय संगीत या प्रकारांतील रसिकप्रिय रचना सादर करणार आहेत.

भारतीय संस्कृतीत वसंत ऋतूला ऋतुराज असे म्हटले जाते. निसर्ग नव्या पालवीने नटतो, फुलांच्या सुगंधाने वातावरण दरवळते आणि मनालाही एक नवीन उत्साह लाभतो.
“आयो रे बसंत, सकल बन फूले,
रंग रस बरसे, गावत पिक बोले.”
या सारख्या अनेक पारंपरिक बंदिशींमधून अनेक नामवंत कलाकारांनी वसंत ऋतूचे व त्या काळातील मानवी भाव विश्वाचे मनोहर चित्र साकारले आहे. या नवचैतन्याची तसेच नवं उन्मेषाची अनुभूती देणारे सूर या चैत्र पालवी मैफलीतून रसिकांना नक्कीच अनुभवता येणार आहेत.
सुरेल गायन, भावपूर्ण सादरीकरण आणि संगीताच्या विविध छटांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी ठरणार आहे.
संगीतप्रेमी रसिकांनी चैत्र पालवी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैफिलीचा आनंद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मित्र मेळा राजापूर संस्थेतर्फे करण्यात आले आहे.