राजापूर (वार्ताहर): राजापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांची निवड झाल्यानंतर पंचायत समितीची पहिली मासिक सभा मंगळवार दि. २४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत किसान भवन येथे सकाळी ११ वाजता होत आहे. या मासिक सभेत तालुक्यातील विविध विकास विषयक कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
राजापूर पंचायत समितीची मावळती सभा ११ मार्च २०२२ ला पार पडली होती. त्यानंतर प्रदीर्घ कालावधी नंतर मासिक सभा पार पडत आहे. तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन काही दिवसापूर्वी तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी यशस्वीरित्या करणे ही महत्त्वाची जबाबदारी असून त्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत त्याबाबत चर्चा होणार हे निश्चित आहे. या व्यतिरिक्त बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, एसटी विभाग, यासह विविध विभागांचा आढावा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेतला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीने दणदणीत विजय मिळवत सर्वच्या सर्व म्हणजे १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या ११ तर मित्रपक्ष भाजपची १ जागा यांचा समावेश आहे. सभापती आणि उपसभापती यांची निवड झाली असून त्यानंतर राजापूर पंचायत समितीची पहिलीच मासिक सभा पार पडत असल्याने त्या सभेमध्ये कोणकोणते विकासाचे मुद्दे उपस्थित होतात ही मोठी उत्सुकता तालुका वासियांना लागून राहिली आहे. राजापूर पंचायत समितीमध्ये दहा सदस्य प्रथमच निवडून गेले असून दोन सदस्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे नवोदित सदस्य कशाप्रकारे मुद्दे मांडतात ते देखील महत्त्वाचे ठरणार आहे.













