पावसाच्या जुन्या पॅटर्नवर अवलंबून राहू नका !

▪️एल -निनोच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी बदला शेतीची पद्धत

  ▪️कोकणात ‘एल-निनो’ मुळे मान्सून लांबण्याची शक्यता

मसुरे | झुंजार पेडणेकर         

जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या हलक्या पावसाच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना सुरुवात केली होती. मात्र ‘एल निनो’ सक्रिय झाल्यामुळे पावसाचा प्रवास रोखला गेला असून, सध्या जिल्ह्यात कडकडीत ऊन पडत आहे. तुरळक पावसावर विश्वास ठेवून ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या पिकांच्या उगवणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.शेतकरी बंधूंनो,

यावर्षी एल-निनो प्रभावामुळे मान्सून उशिरा येण्याची, पाऊस कमी पडण्याची किंवा असमान वितरणाची शक्यता लक्षात घेता, खरीप हंगामावर याचा विपरीत परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत.आडवी पेरणी करताना कमी कालावधीच्या वाणांची निवड करा.पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आडवी पेरणी पद्धत वापरा. पाण्याचा संचय करा आणि पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्याचा वापर करा. कमी पावसासाठी आणि कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड करा.तापमान चढ-उतार व दुष्काळ सहनशील वाण वापरा. व जैविक खतांचा वापर वाढवून मृदा आरोग्य टिकवा. पाण्याचा अपव्यय टाळून उत्पादन वाढवा. मल्चिंग आणि सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवा.भूजल पातळी वाढवण्यासाठी जलसंधारण उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ▪️पावसाच्या कालिक वितरणावर परिणाम होणार! डॉ. युशवंत मुठाळ

एल निनो या हवामान घटनेचा कोकणातील भात शेतीवर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत ग्रामीण कृषी मौसम सेवा मुळदे संशोधन केंद्र येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी दिली आहे. नैऋत्य मौसमी पाऊस वेळेवर न आल्यास कोरडा ऋतू होऊ शकतो आणि रोपांना पाणी कमी मिळून रोपे सुकण्याची सुद्धा शक्यता आहे. हंगामाच्या मध्यावर किंवा हंगामाच्या शेवटी सुद्धा पावसाचा दुष्काळ होऊ शकतो. त्यामुळे भात, वरी शेती पुनरुत्पादनात असताना उत्पादनात घट होऊ शकते. हंगामाच्या सुरुवातीला कोरडा पडल्यास रोपवाटिका वाढ निकृष्ट दर्जाची झाल्यास रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. रोपवाटिकेत ग्लीरीसिडीया, गिरीपुष्प पाल्याचे आच्छादन करावे. त्यामुळे मृदेमध्ये ओलावा राहू शकतो. रोपवाटिकेत नत्र खताची मात्रा द्यावी. दहा ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यात फवारावे.

▪️पाऊस लांबला तर….!

पाऊस लांबला तर हळव्या जातीचे बियाणे वापरावे. निमगरव्या किंवा गरव्या जातीची बियाणे 130 ते 150 दिवसाचा कालावधी घेतात अशा जातीच्या भाताच्या वाणाची लागवड करावी. त्यामध्ये रत्नागिरी 73, रत्नागिरी 24, रत्नागिरी 1, रत्नागिरी 5, कर्जत 3 वानाची पेरणी करावी. चार आठवडे उशीर झाल्यास पाणी नसल्यास मॅट पद्धतीने रोपे उपलब्ध करावी. पाऊस लांबल्यास भुईमूग कमी कालावधीचा करावा त्यामध्ये फुलेप्रगती या जातीची पेरणीकरण्यास हरकत नाही. ▪️पाऊस अनियमित असणार

पुनर लागवडीच्या वेळी पाऊस गेल्यास लावणी करताना पाच ते सहा रोपे एका वेळी लावावी. चिखलणीच्या वेळी नत्र खताची मात्रा वापरावी. आणि दोन रोपांमधील अंतर कमी करावे. रोपांची कमतरता भासल्यास रोहू काढलेले बियाणे वापरावे. हंगामाच्या मध्यावर दुष्काळ आल्यास बाह्यस्त्रोतांतून पाणी घेऊन पाणी पुरवठा करावा. पोटरी अवस्थेत असताना खाचरामध्ये 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. यावर्षी पावसाचे प्रमाण अनिश्चित राहणार आहे. उत्तरार्धात दुष्काळ आल्यास पिके पक्व झालेली असतात. त्यामुळे भात पीक लवकरात लवकर कापणी करावी आणि रब्बी हंगामासाठी ओलावा मिळून त्यामध्ये रब्बी हंगामातील पिके घेता येऊ शकतात. सरासरीपेक्षा कमी पाऊस व वितरण हे असमान असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अभ्यास करूनच भात शेती करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

▪️”शेती वाचवा” अभियानाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन – डॉ. विलास सावंत खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकर्‍यांना सध्या एल निनोच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. एल निनो म्हणजे पूर्व आणि मध्य प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठ भागाच्या तापमानात वाढ होणे. याचा परिणाम जागतिक तापमानवाढीत होतो. एल निनोचा थेट परिणाम नैऋत्य मान्सूनवर होतो व त्याचे रूपांतर दुष्काळात होते. एल निनो मुळे जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस सरासरी पेक्षा कमी पडतो. किर्लोस कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा द्वारे “शेती वाचवा” अभियानद्वारे थेट गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या खरीप हंगामामध्ये हळव्या व निमगरव्या जातींची लागवड करावी. बियाण्याची पेरणी थोडी उशिराने करावी. सिंचनाच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे. सेंद्रिय खते व जैविक निविष्ठा शेतावरच तयार करून मोठ्या प्रमाणात वापरावीत. फळ बागायतींना नैसर्गिक आच्छादन करावे. शेतीची चांगल्या प्रकारे बांधबंदिस्ती करावी. रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. रोग व किडींचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करावे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. विलास य. सावंत यानी दिली आहे.

▪️खरीप हंगाम आव्हानात्मक- चालू वर्षातील ‘एल निनो’ या जागतिक हवामान बदलाच्या संकटामुळे कोकण किनारपट्टीवरील खरीप हंगामासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले आहे. कृषी विभाग, किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि मुळदे संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी केवळ पाऊस लांबणारच नाही, तर मान्सूनच्या संपूर्ण कालावधीत पावसाचे वितरण अत्यंत असमान आणि अनिश्चित असेल. ही स्थिती लक्षात घेता, पारंपारिक पद्धतीने शेती करणे यावर्षी शेतकऱ्यांसाठी मोठ्या नुकसानीचे ठरू शकते.शेतकऱ्यांनी पावसाच्या जुन्या पॅटर्नवर अवलंबून न राहता हवामानातील बदलांनुसार आपल्या शेतीचे वेळापत्रक लवचिक ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.