दिनेश वारंग यांच्या सेवाभावी कार्याचे दत्ता सामंत यांच्याकडून कौतुक
स्वप्निल कदम (घावणाळे) :सेवाभावी स्वभावाचा माणूस कधीच मागे पडत नाही. समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड माणसाच्या कृतीतून दिसून येते. आपल्या गावाचे नाव मोठे व्हावे आणि गावकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी दिनेश वारंग हे सातत्याने प्रयत्नशील असतात. कमी वयात समाजकारण व राजकारणात त्यांनी घेतलेली उडी कौतुकास्पद असून ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. भविष्यात त्यांचे नेतृत्व तालुक्यासह जिल्हाभरात उभे राहावे, असे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी काढले.
दिनेश वारंग मित्र मंडळ व शिवसेना घावणाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आमदार चषक 2026’ भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन घावणाळे येथे दत्ता सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना गटनेते दीपक नारकर, सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेश अहिर, रुपेश कानडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पंचायत समिती सदस्या अर्चना घावणाळकर, सामाजिक कार्यकर्ते तसेच माणगाव शिवसेना शहरप्रमुख दत्ता कोरगावकर, दीपक खरात, दिलीप निचम, सुरज कदम, राम बांदलकर, सद्गुरू घावणाळकर, प्रभाकर जाधव आदींसह गावचे सरपंच, उपसरपंच, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत यांनी क्रीडाप्रेमी व खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये अनेकदा विजयानंतरच्या बक्षीस वितरण समारंभाला खेळाडू अनुपस्थित राहतात. आयोजक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने अशा स्पर्धांचे आयोजन करतात. त्यामुळे स्पर्धक व क्रीडारसिकांनी आयोजक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश वारंग मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त ‘आमदार चषक 2026’ क्रिकेट स्पर्धेसह गावातील सर्व शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, भव्य रक्तदान शिबिर आदी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी व संघांनी सहभाग घेतला आहे. तसेच मंडळाच्या वतीने स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू व क्रीडारसिकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी संजय आंग्रे, संजय पडते, मिलिंद नाईक, दीपक खरात, अरविंद करलकर, दत्ता कोरगावकर आदींनी मनोगत व्यक्त करत मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार घावनाळकर यांनी केले.












