पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांना ग्रामपंचायतीतर्फे निवेदन
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्वीकारले पत्र
कुडाळ । प्रतिनिधी :कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या वालावल येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण तलावातील गाळ काढणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत वालावलच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या नावाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आले.
वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते, तसेच अनेक मराठी व हिंदी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरणही या नयनरम्य परिसरात होत असते. मात्र, सध्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून संपूर्ण तलाव जलपर्णीने व्यापला आहे. यामुळे परिसरातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या तलावातील गाळ काढून योग्य ते सुशोभीकरण झाल्यास परिसरात जलपर्यटन, कृषीपर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून गावाच्या विकासाला नवा वेग प्राप्त होईल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा ३ कोटींचा निधी लवकरात लवकर मंजूर करावा, अशी आग्रही मागणी निवेदनावारे करण्यात आली आहे.
यापूर्वी पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी सदर तलावाची पाहणी करून सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, मनीष दळवी यांनी वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित गुरुवर्य भजन स्पर्धेच्या प्रसंगी भेट दिली असता वालावल गावचे सरपंच राजेश प्रभु व भारतीय जनता पार्टीचे कुडाळ तालुका सरचिटणीस लक्ष्मण उर्फ गुरु देसाई यांनी तलाव व परिसराच्या सुशोभीकरणाचे काम किती आवश्यक आहे, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन तलावाचे सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दळवी यांनी ग्रामस्थांना दिले. याच अनुषंगाने हे निवेदन दळवी यांच्याकडे सोपवण्यात आले असून, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सदर निवेदन सोपवताना वालावल गावचे सरपंच राजेश प्रभु, भाजप तालुका सरचिटणीस लक्ष्मण उर्फ गुरु देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रितम वालावलकर, राजू बंगे, मनोज पाटकर, प्रसाद वालावलकर आणि समीर चौधरी उपस्थित होते.













