देवरूख (प्रतिनिधी)
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ऑटोमोबाईल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बीएस सिक्स (BS VI) वरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग मेकॅनिक असोसिएशन, कणकवली शाखेच्या अनुभवी प्रशिक्षकांच्या सहयोगातून अतिरिक्त अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अनिरुध्द जोशी तसेच सिंधुदुर्ग मेकॅनिक असोसिएशन, कणकवली शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, संदीप पारकर, प्रशांत राणे आणि दशरथ चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी मान्यवर प्रशिक्षकांचे स्वागत केले. यावेळी या शिबिराच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना वाहन प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी २०२० पासून भारतात लागू करण्यात आलेल्या भारत स्टेज ६ (BS6/BSVI) या अनिवार्य उत्सर्जन मानकाच्या विविध पैलूंचे ज्ञान प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. या शिबिराच्या प्रशिक्षकांचे देखील त्यांनी यानिमित्ताने आभार मानले.
मा. रविंद्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी हे प्रशिक्षण फायदेशीर . तसेच अशा प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सराव प्राप्त होतो व त्यातून योग्य दृष्टीकोन तयार होण्यास मदत मिळते असेही ते म्हणाले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणादरम्यान भारत स्टेज ६ मधील उत्सर्जन मानदंड, प्रगत इंजिन तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय नियमांबद्दल विद्यार्थ्यांना सखोल तांत्रिक माहिती देण्यात आली. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना त्यांची व्यावहारिक समज सुधारण्यासाठी आणि उद्योगाच्या गरजांसाठी तयार करण्यास मदत मिळणार आहे. या शिबिरामध्ये एकूण ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. डॉ. अनिरुध्द जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रवण करकरे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले तर भालचंद्र चव्हाण, श्रेयस बाणे अश्वजीत कांबळे, निखील विचारे, प्रेम धनावडे इ. विद्यार्थी सदस्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.













