टेपवणे नदीपात्रातील गाळ काढून जलसाठा वाढविण्याचा स्तुत्य उपक्रम
चिपळूण (प्रतिनिधी) : पाण्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना जलसंधारण आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी लोकसहभागातून होणारे प्रयत्न निश्चितच आशादायी ठरत आहेत. गावाचा विकास केवळ शासकीय योजनांवर अवलंबून नसून त्यासाठी ग्रामस्थांची एकजूट, सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकीही तितकीच महत्त्वाची असते, याचा प्रत्यय चोरवणे येथे आला. नाम जलसाठा अभियानांतर्गत ग्रामपंचायत चोरवणे-निवे, नाम फाऊंडेशन, अनुलोम आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून टेपवणे नदीवर ‘विजय बंधारा’ साकारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ग्रामस्थांनी, महिलांनी आणि ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी सलग तीन दिवस श्रमदान करून हा जलसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी केला. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या चोरवणे गावात पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या कामासाठी नाम फाऊंडेशनने जेसीबी मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली. तर त्यासाठी लागणाऱ्या डिझेलची व्यवस्था ग्रामपंचायत चोरवणे-निवे यांच्याकडून करण्यात आली. संस्थात्मक सहकार्याला ग्रामस्थांच्या श्रमदानाची जोड मिळाल्याने अवघ्या तीन दिवसांत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास गेले. नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी प्रथमेश पोमेंडकर, शाहनवाज शाह, अनुलोम संस्थेचे मयुरेश पाटणकर, ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश पाडवी, माजी उपसरपंच प्रवीण सावंत तसेच शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख श्री. जगताप यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. या उपक्रमात महिलांनीही मोठ्या उत्साहाने आणि मेहनतीने सहभाग घेतला.
गावापासून दूर राहणाऱ्या ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनीही चोरवणे येथे उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. आपल्या गावाशी असलेली नाळ जपत गावाच्या विकासासाठी पुढे येण्याचा हा सहभाग निश्चितच कौतुकास्पद ठरला. या कामांतर्गत टेपवणे नदीपात्रातील गाळ आणि दगड काढून नदीची खोली सुमारे पाच ते सहा फूट वाढविण्यात आली. तसेच सुमारे ७० बाय १० फूट आकाराचा विजय बंधारा उभारण्यात आला. बंधाऱ्याला पिचिंग करून त्यावर मातीचा पहिला थर देण्यात आला. त्यानंतर प्लॅस्टिकचा थर टाकून पुन्हा मातीचा दुसरा थर देण्यात आला. या कामामुळे नदीपात्रात पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा करण्यास मदत होणार असून परिसरातील भूजलसाठा वाढण्यासही हातभार लागण्याची अपेक्षा आहे. जलसंवर्धनाच्या या कार्यामागे नाम फाऊंडेशनचे संस्थापक कै. पद्मश्री नानासाहेब पाटेकर यांचे स्वप्न आणि उद्दिष्ट पुढे नेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आणि मल्हार पाटेकर यांनी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करण्याचा पुढाकार घेतला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे आणि ग्रामस्थांचा सहभाग मिळू शकतो, अशा ठिकाणी बंधारे व नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, मशीनसाठी लागणाऱ्या इंधनाची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकसहभागातून करणे अपेक्षित आहे.
या अभियानांतर्गत ज्या ग्रामपंचायतींना बंधारे, नाले यांमधील गाळ काढून पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी अथवा भूजलसाठा वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करायची आहेत, त्यांनी नाम फाऊंडेशनचे प्रथमेश पोमेंडकर (९५६१३२९२६०) किंवा शाहनवाज शाह (९८२२८२०३९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोरवणे येथील विजय बंधारा हा केवळ पाणी अडविण्याचा उपक्रम नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचे, श्रमदानाच्या सामर्थ्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे. शासन, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास जलसंकटावर निश्चितच मात करता येऊ शकते, हा संदेश या उपक्रमाने दिला आहे. चोरवणे गावाच्या या आदर्श उपक्रमातून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील अन्य गावांनीही जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.












