निगुडेत शेत विहिरीतील सौरपंपाची चोरी

अज्ञात विरोधात फिर्याद दाखल 

बांदा : प्रतिनिधी

 

निगुडे – गावठणवाडी येथील शेत विहिरीत बसविलेल्या सौर पंपाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शुभलक्ष्मी गुरुनाथ सूर्यवंशी यांनी बांदा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

 

तक्रार अर्जात म्हटले आहे की, निगुडे गावठणवाडी येथे शुभलक्ष्मी सूर्यवंशी यांची शेतजमिनीमध्ये विहीर असून विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी महाकृषी ऊर्जा अंतर्गत सौर कृषी पंप बसविण्यात आला होता. बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सदर पंप विहिरीमध्ये दिसून न आल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध बांदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंद करण्यात आली आहे.

 

बांदा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील सुचिता मयेकर, शेतकरी केशव मयेकर, विठू गवंडे, अशोक धुरी, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी राजेश मयेकर उपस्थित होते. सदर चोरीचा तपास वेगाने होऊन चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजेश मयेकर यांनी केली आहे.