खेडमध्ये भाजपकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

संसद परिसरातील ‘चहा पार्टी’वरून संताप

खेड (प्रतिनिधी) : १२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना संसद भवनाच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेस नेते Rahul Gandhi यांच्यासह विरोधी पक्षांच्या सुमारे २० खासदारांनी चहा-बिस्कीटसह ‘चहा पार्टी’ आयोजित केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ खेड शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून भाजप कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

संसद ही देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था असून तिची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. मात्र संसद परिसरात अशा प्रकारे ‘चहा पार्टी’चे आयोजन करून विरोधकांनी संसदेला एकप्रकारे ‘पिकनिक स्पॉट’ बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या घटनेमुळे देशाच्या लोकशाही परंपरेला धक्का बसल्याची भावना व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी आणि तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
आंदोलनावेळी भाजप गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलिंद (दादू) नांदगावकर, माजी नगरसेविका आशाताई सनगरे, तसेच राहुल पाटणे, सिद्धेश पाटणे, शशांक सिनकर, विशाल होळकर, बाळू वर्मा, विजय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे खेड शहरात काही काळ राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.