ज्ञानदीप महाविद्यालयात जिल्हास्तरीय एस.आर.डी./एन.आर.डी. निवड शिबिर उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय एस.आर.डी./एन.आर.डी. निवड शिबिर उत्साहात पार पडले. बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या निवड शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी तालुका समादेशक श्री. नंदकुमार चाळके, रत्नागिरी हायवे ट्राफिक पोलीस श्री. पी. जे. गव्हाणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे तसेच क्षेत्रीय समन्वयक डॉ. युवराज पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्त्व विकास रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचे मूल्यमापन करून त्यांना पुढील स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या जिल्हास्तरीय निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
निवड प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञान, शारीरिक क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्वगुणांची विविध निकषांच्या आधारे चाचणी घेण्यात आली. यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ प्रमुख महाविद्यालयांमधील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी या निवड प्रक्रियेत सहभाग घेत आपले कौशल्य, क्षमता आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.
निवड शिबिरादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रिया बावकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिबिरातील विविध चाचण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवा आणि राष्ट्रसेवेत योगदान देण्याची भावना व्यक्त केली.
या प्रसंगी श्री. भालचंद्र कांबळे, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल, श्री. आकाराम माने यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढ्ढा तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष कौतुक केले.