वैभववाडीत उद्या कृषी प्रदर्शन

प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार सन्मान

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत वैभववाडी तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन बुधवार दि. 18 मार्च रोजी सकाळी 10 वा. पंचायत समिती सभागृहामध्ये होणार आहे.

या कृषी प्रदर्शनामध्ये परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन व शेतकरी सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता तालुक्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामध्ये बचत गट व इतर कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन व कृषी विषयक मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर एस सावंत यांनी केले आहे.