बिजघर–खेड एसटी बसचा थरारक अपघात टळला; कोंडवाडी येथे ब्रेक निकामी, 30 ते 35 प्रवासी बचावले

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजघर ते खेड दरम्यान धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा कोंडवाडी परिसरात अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही एसटी बस नेहमीप्रमाणे प्रवासी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन खेडकडे निघाली होती. बसमध्ये सुमारे 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. कोंडवाडी परिसरात आल्यानंतर अचानक बसचा ब्रेक निकामी झाला. बसचा वेग वाढू लागल्याने काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अशा गंभीर परिस्थितीत चालकाने अत्यंत धाडस आणि तत्परता दाखवत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळवून थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले.
घटनेनंतर काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या देखभाल आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बसच्या तांत्रिक तपासणीची मागणी करण्यात येत आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.