३३९ प्रलंबित ३९१८ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली
रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार १४ मार्च रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत पार पडले. या लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी ४१८४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वाद दाखलपूर्व एकूण १७९६३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रलंबित प्रकरणांपैकी ३३९ एवढी प्रकरणे सामोपचाराने व तडजोडीने निकाली निघाली. त्याचबरोबर ठेवण्यात आलेल्या वादपूर्व प्रकरणांपैकी एकूण ३९१८ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी दिली.
या लोकअदालतमध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा उस्फूर्त सहभाग होता. या लोकअदालतमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश संबंधीत खटले, वैवाहिक वाद अशी प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे, बँका, पतसंस्था, थकीत वीजबिले, टेलिफोनची थकीत बिले इत्यादी प्रकरणांमध्ये तडजोड झाली.
हे लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील न्यायाधीश व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.












