दापोली प्रतिनिधी – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दापोली व दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरण (HPV Vaccination Series) हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा लसीकरण कार्यक्रम शाळांमध्येच, शाळेच्या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, पालकांची लेखी संमती मिळाल्यानंतरच विद्यार्थिनींना ही लस दिली जाणार आहे.
HPV लस ही भविष्यात होऊ शकणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देणारी सुरक्षित व प्रभावी लस मानली जाते. मुलींच्या निरोगी भविष्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम आहे.
या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, तसेच दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल प्रशांत मेहता, उपाध्यक्ष निकेत रमेश मेहता आणि सचिव मयुरेश मिलिंद शेठ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
तरी सर्व पालकांनी या उपक्रमास सहकार्य करून आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











