पाडलेच्या श्री दत्तसेवक भजन मंडळाचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

दापोली (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दापोली सांस्कृतिक महोत्सव २०२६’ अंतर्गत पार पडलेल्या तालुकास्तरीय भजन स्पर्धेत पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे पाडले गावाचे नाव तालुक्यात अभिमानाने उजळले आहे.
या स्पर्धेत दापोली तालुक्यातील विविध भागांतील भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. पारंपरिक वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत श्री दत्तसेवक भजन मंडळाने सादर केलेल्या भजन, रूपावली, गजर, अभंग आणि गवळणींनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणात असलेले भक्तीभाव, सुरेल गायन, तालबद्ध साथसंगत आणि एकसंध सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
मंडळाचे प्रमुख गायक बुवा जीवन वसंत गुहागरकर यांनी आपल्या दमदार आणि हृदयस्पर्शी आवाजात भजन सादर करत कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या गायनाला सुदर्शन बुरंबाडकर यांनी पखवाजवर तर प्रथमेश आंजर्लेकर यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली. वाद्य आणि गायन यांचा सुरेख मेळ साधल्यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी ठरले.
यावेळी जीवन बुवांनी दापोली सांस्कृतिक महोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित एक विशेष गजर सादर केला. या गजरातून कोकणातील समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि मराठी संस्कृती जपण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. या सादरीकरणाला परीक्षकांसह उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्री दत्तसेवक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशाबद्दल पाडले गावातील नागरिक, भजन रसिक तसेच वारकरी मंडळींकडून मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दापोली सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक कला, भजन-कीर्तन, संगीत आणि लोकसंस्कृतीला एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळत आहे. या उपक्रमामुळे सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन होण्यास हातभार लागत असल्याचे मत सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.