प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची माहिती
विरोधकांनी ‘फेक नरेटिव्ह’ न पसरवता पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावे
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यावर केवळ दोन महिन्यातच आम्ही तब्बल ६५ विकासकामांवर भर दिला आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या आजच्या स्थायी समिती बैठकीत या ६५ विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांची तांत्रिक पूर्तता करून पालकमंत्री नितेश राणे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
नियोजित कामांमध्ये शहरातील भुयारी गटारी योजना व जिमखाना मैदानाचे संपूर्ण नूतनीकरण
यांसारख्या शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचा ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार करण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतात यात आम्हाला रस नसून, शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडताना विरोधकांच्या आरोपांचेही खंडन केले. आम्हाला सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे त्यामुळे कोण काय बोलते त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो याला आम्ही प्राधान्य दिले आहे असेही ते म्हणाले.
आज नगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिलीच सभा पार पडली. या सभेमध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीने ६५ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकल्पांचा नरेंद्र डोंगरावर ४ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक ‘योगा व मेडिटेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. ऐतिहासिक राजवाडा समोरील तलावाकाठी १ कोटी ६० लाख रुपये खर्चून पर्यटकांना आकर्षित करणारी खाऊ गल्ली साकारली जाईल.
तर बॅरिस्टर नाथ पै सभागृहातील त्रुटी दूर करून ९० लाख रुपये खर्चातून त्याचे नूतनीकरण करण्यात येईल.
तसेच प्रत्येक प्रभागातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी ‘सर्वांना समान न्याय’ या तत्त्वावर निधीचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले .
*महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार*
शहरातील मैदानांचा प्रश्न आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना हे दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिल्याच कौन्सिलमध्ये यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. सध्या कोल्हापूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही प्रकल्पांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे पावले उचलली जातील. यासाठी पालकमंत्री नितेश राणे तसेच प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गॅस पाईपलाईनच्या कामावरून सत्ताधाऱ्यांवर होणाऱ्या आरोपांना निरवडेकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “गॅस पाईपलाईनच्या कामात पैसे घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी नावासहित पुरावे सादर करावेत. पुरावे असल्यास आम्ही संबंधितांवर तात्काळ कारवाई करू. केवळ जनतेत ‘फेक नरेटिव्ह’ पसरवून लोकांची दिशाभूल करू नका. संबंधित कंपनीला शासन स्तरावरून सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. नगरपालिकेकडे केवळ रस्ते खोदाई व नूतनीकरण आणि तत्सम तांत्रिक बाबींचा अधिकार येतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.












