सावंतवाडी : शहरातील ‘अन्वर फ्लॉवर मर्चंट’चे मालक तसेच संस्थानकालीन जलालशहा पीर (बाहेरचावाडा) येथील मुख्य मुजावर अन्वर मोहम्मद शहा (वय ७७) यांचे आज दुपारी कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडीच्या व्यापारी, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
अन्वर शहा हे सावंतवाडीच्या संस्थानकालीन काळापासून बाजारपेठेत कार्यरत असणारे एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. ‘अन्वर फ्लॉवर मर्चंट’च्या माध्यमातून त्यांनी प्रदीर्घकाळ शहरात फुलांचा व्यवसाय सांभाळला. त्यांचा मनमिळावू, शांत स्वभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना यामुळे सर्वच समाजघटकांत त्यांचा मोठा स्नेह होता. बाहेरचावाडा येथील प्रसिद्ध जलालशहा पीर दर्ग्याचे मुख्य मुजावर म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी चोख पार पाडली.
व्यापारासोबतच सामाजिक व राजकीय घडामोडींमध्येही ते सक्रिय असत. त्यांनी यापूर्वी सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूकही लढवली होती. आजाराशी झुंज देत असताना अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी जावई नातवंड भाऊ भाऊजया पुतणे नातवंडे असा परिवार आहे











