जानवली पुलानजीक गुटखा विक्रीवर एफडीएचा छापा

एक हजार रुपयांचा गुटखा जप्त

स्टॉलधारकाला अटक

कणकवली : जानवली पुलानजीक एका स्टॉलवर अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे एक हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी स्टॉलधारक आणि गुटखा पुरवणारा अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत स्टॉलधारक संशयित केतन राजेंद्र देऊलकर (२८, रा. तरंदळे-कुंदेवाडी) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली.

सिंधुदुर्गच्या अन्नसुरक्षा अधिकारी तेजश्री नाचणे यांनी याबाबत फिर्याद दिली. गुटखा पुरवणारा संशयित सतीश उर्फ शक्ती देवर (रा. वरवडे) हा पोलिसांना मिळून आलेला नसून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करत आहेत.